MAHA CONCLAVE : ‘सकाळ’तर्फे आजपासून सहकार महापरिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar MAHA CONCLAVE
‘सकाळ’तर्फे आजपासून सहकार महापरिषद

MAHA CONCLAVE : ‘सकाळ’तर्फे आजपासून सहकार महापरिषद

पुणे : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने शुक्रवारपासून (ता. १७) पुण्यात दुसऱ्या सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले आहे. या दोनदिवसीय महापरिषदेचे उद्‍घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर, समारोपप्रसंगी शनिवारी (ता. १८) केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ प्रस्तुत या सहकार महापरिषदेस ‘दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक’ आणि ‘एस. एस. इंजिनिअर्स’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या महापरिषदेत सहकारी बॅंकिंग आणि साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा होणार आहे. तसेच, केंद्र आणि राज्यातील धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.

‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने यापूर्वी दोन ऑक्टोबर २०२१ पासून तीन दिवसीय सहकार महापरिषदेचे आयोजन केले होते. ‘सकाळ’ माध्यम समूहाने नागरी सहकारी बॅंकिंग, पतसंस्था आणि साखर उद्योग क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा घडवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे साखर कारखान्यांचा प्राप्तीकर माफ होण्यासह सहकारी संस्थांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. याच पार्श्वभूमीवर यंदा दुसरी सहकार महापरिषद होत आहे.

या मान्यवरांची उपस्थिती
पुण्यातील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल येथे आयोजित या महापरिषदेसाठी पवार व शहा यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यांचे होणार मार्गदर्शन
या महापरिषदेत राज्यातील प्रमुख सहकारी बॅंका आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय साखर महासंघ, महाराष्ट्र राज्य साखर संघ, वेस्टर्न शुगर मिल असोसिएशन, राज्य सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट पतसंस्थांचे प्रमुख पदाधिकारी आणि तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे. या वेळी सहकारी बॅंकिंग आणि साखर उद्योगाशी संबंधित विषयांवर स्वतंत्रपणे चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेत राज्यातील नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक
को-ऑपरेटिव्ह बॅंकिंग महाकॉन्क्लेव्ह- ९८८१७१८८९०, ९८८१०९९०५३, ९८२०३१६२७५
साखर उद्योग महाकॉन्क्लेव्ह- ९८५०१५१००५, ९८८१०९९०५३, ९८२०३१६२७५