
चिल्हेवाडी धरणाचा पाणीपुरवठा होणार सुरू
पुणे, ता. १६ : चिल्हेवाडी धरणातून तालुक्याच्या पूर्व भागातील १९ गावांसाठी आता बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोळका झाला आहे. या कामासाठी राज्य सरकारने ३५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ६ हजार ३७२ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे.
जुन्नर तालुक्यात चिल्हेवाडी हे मध्यम प्रकल्पाचे धरण आहे. या धरणाची साठवण क्षमता एक अब्ज घनफूट (एक टीएमसी) एवढी आहे. या धरणाचे काम २००० मध्ये पूर्ण झाले असून, जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील १९ गावांना बंदिस्त नलिकेच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सुमारे ३९ किलोमीटर लांबीची बंदिस्त नलिका टाकावी लागणार आहे. या कामासाठी पहिल्यांदा २०१० मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यामुळे १९४ कोटींचा निधी प्राप्त होऊन सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले होते. निधी संपल्याने हे काम थांबले होते. उर्वरित कामासाठी ३१३ कोटींचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता हे लवकरच सुरू होणार आहे. परिणामी तालुक्यातील पूर्व भागातील १९ गावांमधील ६ हजार ३७२ हेक्टरमधील जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. ही बंद नलिका धरणाजवळ १५०० मीटर व्यासाची असणार आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.