पुण्यात शिंदे गटाचा जल्लोष निवडणूक आयोगाचा निर्णय : खरे शिवसैनिक शिंदेंबरोबर असल्याची भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात शिंदे गटाचा जल्लोष 
निवडणूक आयोगाचा निर्णय : खरे शिवसैनिक शिंदेंबरोबर असल्याची भावना
पुण्यात शिंदे गटाचा जल्लोष निवडणूक आयोगाचा निर्णय : खरे शिवसैनिक शिंदेंबरोबर असल्याची भावना

पुण्यात शिंदे गटाचा जल्लोष निवडणूक आयोगाचा निर्णय : खरे शिवसैनिक शिंदेंबरोबर असल्याची भावना

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर पुण्यातील शिवसैनिकांनी सारसबाग येथील कार्यालयासमोर फटाके फोडून, पेढे वाटून जोरदार जल्लोष केला. पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करत खरे शिवसैनिक हे शिंदे यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया दिली. तर ठाकरे गटाने चिन्ह कोणाला गेले, तरीही स्वाभिमानी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, असे ठणकावून सांगितले.

शिवसेना या नावासाठी आणि धनुष्यबाण चिन्हासाठी महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी आयुष्य झिजवलं होतं, त्याच्यासाठीच स्वतःला वाहून घेतलं होतं. निवडणूक आयोगाने कायद्याच्या कसोटीवर तपासून दोन महिन्यांनंतर निर्णय दिला. ५० आमदार, १३ खासदार यांच्या मतांची बेरीज केली, तर किंचित सेनेकडे ५ टक्केदेखील मते शिल्लक नव्हती. महाराष्ट्रातील जनतेला हेच अपेक्षित होतं. हे दान आमच्या पदरात टाकलं, याबद्दल आयोगाचे धन्यवाद. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही आमच्याच बाजूने लागेल आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल.
- डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

एकनाश शिंदे यांना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर कायदेशीर विषयावर मत व्यक्त करणे बरोबर नाही. पण सत्याचा विजय झाला. आम्ही जसं खिलाडूवृत्तीने घेतलं तसं तुम्ही पण घ्या. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली, तो त्यांना अधिकार आहे. या निर्णयावर तुम्ही संशय घेणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर तुम्ही संशय घेत आहात.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा सर्वसामान्य, निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचाराने उठाव केला. त्यांना ५० आमदार, १३ खासदार व लाखो शिवसैनिकांनी साथ दिली. आजच्या निर्णयामुळे आमचा उठाव योग्यच होता हे स्पष्ट झाले. येणाऱ्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप व आमची युती भगवा फडकावेल.
- प्रमोद (नाना) भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना

बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. तर पक्षाचे नुकसान करणारे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे विचार घेऊन पुढे जात आहोत.
- किरण साळी, राज्य सचिव, युवासेना

लाखो शिवसैनिकांच्या मनात जे होते तेच केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच आम्हाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्याने आमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत.
- अजय भोसले, संपर्कप्रमुख

केंद्र सरकार, राज्यातील ईडी सरकारने हा निर्णय निवडणूक आयोगाला द्यायला भाग पाडले आहे. शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह गेले असले, तरी आमची निष्ठा ही ठाकरे घराण्याशी आहे. नाव व चिन्ह गेले तरी आमच्यासारखे शिवसैनिक पेटून उठून धडा शिकवतील.
- गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)