कसबा विश्लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा विश्लेषण
कसबा विश्लेषण

कसबा विश्लेषण

sakal_logo
By

दुरंगी लढतीत लागणार भाजपचा कस

अजिंक्य गटणे : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १८ : कसबा विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील या दुसऱ्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. पहिल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. आता भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहेत. १९९५ पासून गेल्या सहापैकी दोन विधानसभा निवडणुका दुरंगी झाल्या असून, उर्वरित चारमध्ये दोनपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरले होते. यात भाजपने आपला बालेकिल्ला अभेद्य राखला. तब्बल १९ वर्षांनंतर होणाऱ्या या दुरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागील सहा विधानसभा निवडणुकांपासून येथे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. तथापि, भारतीय जनता पक्षाची प्रभावी यंत्रणा व संघटन, गिरीश बापट यांची मतदारसंघावर असणारी पकड या गोष्टींचे त्यामध्ये मोठे योगदान होते.

सन १९९५ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई यांना उमेदवारी दिली. या दुरंगी लढतीत बापट यांना ५३०४३ तर देसाई यांना ३२२८३ मते मिळाली. एकूण वैध मतांपैकी ५८.३१ टक्के मते घेऊन बापट यांनी विजय मिळवला. पुढे सन १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. त्यावेळी या मतदारसंघात भाजपचे बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा थोरात आणि काँग्रेसचे संजय बालगुडे अशी तिरंगी लढत झाली. त्यात बापट यांना ३९४१९, थोरात यांना १९२५१ आणि बालगुडे यांना १३०६५ मते मिळाली. बापट यांनी एकूण वैध मतांपैकी ५४.६५ टक्के या वेळी मिळवली. येथे काँग्रेसपेक्षा त्यावेळी नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रवादीने जास्त मते मिळवली.

पुढील पंचवार्षिक निवडणुकीत २००४ मध्ये पुन्हा भाजपचे बापट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे थोरात यांच्यात पुन्हा दुरंगी सामना रंगला. त्यामध्ये बापट यांनी ३८१६० तर थोरात यांनी २८५४२ मते मिळवली. यामध्ये थोरात यांचा ९,६१८ मतांनी पराभव झाला. दरम्यानच्या काळात झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाली. उदाहरणार्थ, नारायण पेठेचा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाला जोडलेला काही भाग कसबा पेठ मतदारसंघात आला. या निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांसमोर विशेषतः शहरी भागात मोठे आव्हान उभे केले होते. कसब्यात त्यावेळी बापट यांच्यासमोर मनसेच्या रवींद्र धंगेकर आणि काँग्रेसच्या रोहित टिळक यांचे आव्हान होते. यात बापट यांनी ५४९८२, धंगेकर यांनी ४६८२० आणि टिळक यांनी ४६७२८ मते घेतली. तिरंगी लढतीत बापट यांनी ३५.३४ टक्के मते मिळवत विजय मिळवला. तथापि, धंगेकर यांनी या निवडणुकीत चांगली लढत दिल्याने निवडणूक रंगतदार झाली.

देशात सत्तांतर झाल्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी आपापल्या ताकदीवर लढवल्या. या वेळी कसब्यातही बहुरंगी लढत झाली. यात भाजप उमेदवार बापट यांनी ७३५९४, काँग्रेस उमेदवार रोहित टिळक यांनी ३१३२२, मनसेच्या धंगेकर यांनी २५९९८, राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी १५८६५ अपक्ष उमेदवार सूर्यकांत आंदेकर यांनी १०००१ तर शिवसेनेच्या प्रशांत बधे यांना ९२०३ मते मिळाली. यामध्ये ‘नोटा’लाही १३७१ मते मिळाली होती.

त्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्यातून लोकसभेला निवडून आल्याने येथे भाजपने आपला उमेदवार बदलत पुण्याच्या तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांनी उमेदवारी दिली. या वेळीही बहुरंगी लढत झाली. ज्यामध्ये भाजपच्या टिळक यांना ७५४९२, काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना ४७२९६, अपक्ष विशाल धनवडे यांना १३९८९, मनसेच्या अजय शिंदे यांना ८२८४ तर ‘नोटा’ला २५३२ एवढी मते मिळाली. टिळक यांनी एकूण वैध मतांच्या ५० टक्के मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मागील तीन निवडणुकांतील आकडेवारी पाहिल्यास दोनपेक्षा अधिक ताकदवान उमेदवार रिंगणात राहिल्याने झालेल्या मतविभाजनाचाही भाजपला लाभ झाल्याचे दिसून येते.

पोटनिवडणुकीत बापट पराभूत
सन १९९१ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कसब्याचे तत्कालीन आमदार लक्ष्मण सोनोपंत ऊर्फ अण्णा जोशी यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी जोशी यांनी तत्कालीन
खासदार, माजी केंद्रीय मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव केला. परिणामी, १९९२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अण्णा थोरात निवडून आले, तर भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा पराभव झाला.

मागील तीन निवडणुकांतील स्थिती
२००९
उमेदवार पक्ष मिळालेली मते
गिरीश बापट भाजप ५४९८२
रवींद्र धंगेकर मनसे ४६८२०
रोहित टिळक काँग्रेस ४६७२८

२०१४
उमेदवार पक्ष मिळालेली मते
गिरीश बापट भाजप ७३५९४
रोहित टिळक काँग्रेस ३१३२२
रवींद्र धंगेकर मनसे २५९९८
दीपक मानकर राष्ट्रवादी काँग्रेस १५८६५
सूर्यकांत आंदेकर अपक्ष १०००१
प्रशांत बधे शिवसेना ९२०३

२०१९
उमेदवार पक्ष मिळालेली मते
मुक्ता टिळक भाजप ७५४९२
अरविंद शिंदे काँग्रेस ४७२९६
विशाल धनवडे अपक्ष १३९८९
अजय शिंदे मनसे ८२८४