पालकांनो, मुलांचा आत्मविश्वास वाढवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांनो, मुलांचा 
आत्मविश्वास वाढवा!
पालकांनो, मुलांचा आत्मविश्वास वाढवा!

पालकांनो, मुलांचा आत्मविश्वास वाढवा!

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : एक विद्यार्थी : ‘‘मला वाटतंय यावेळी पेपर खूप अवघड येणार आहे, मला खूप रडावेसे वाटतंय.
दुसरा विद्यार्थी : ‘‘तुला, ....इतके टक्के गुण मिळालेच पाहिजे, असे वडील सातत्याने सांगत आहेत. मला खूप भीती वाटतीयं’’...हे आहेत दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशकांकडे आलेल्या फोनमधील संवाद. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारे संवाद सातत्याने कानावर येत असल्याचा अनुभव समुपदेशक सांगतात.
खरंतर परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करणे गरजेचे आहे. यात पालकांची भूमिका ही महत्त्वाची ठरते. परीक्षेच्या काळात पालकांनी घरातील वातावरण तणावमुक्त करायला हवे, त्याशिवाय घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न कसे राहील, याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला समुपदेशक, शिक्षक देत आहेत.
विद्यार्थ्यांचा परीक्षेचा हाच ताण कमी करण्यासाठी, त्यांना नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फोनद्वारे समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. या समुपदेशकांमार्फत भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येते. या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक राज्य मंडळाने ‘https://www.mahahsscboard.in/’ या अधिकृत संकेतस्थळावर यापूर्वीच दिले आहेत.
दरम्यान, पालकांनीही घरातील वातावरणात जास्तीत जास्त सकारात्मक कसे राहील, याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. परीक्षेच्या काळात तणावमुक्त वातावरण, मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही असे घरातील वातावरण असावे, असा सल्ला समुपदेशकांनी पालकांना दिला आहे.

पालकांसाठी टिप्स
हे करावे
१. घरातील वातावरण सकारात्मक, प्रसन्न ठेवा
२. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा, परीक्षेचा ताण कमी करावा
३. मुलांना पुरेसा वेळ आणि आधार द्या
४. मुलांचा आत्मविश्वास वाढवा
५. मुलांसोबत आहोत, असा अनुभव सतत मुलांना द्या
६. मानसिक आधार द्यावा

हे करू नये
१. मुलांची इतरांशी तुलना करणे
२. घरात वाद, भांडण, तणाव निर्माण करणे
३. निकालाबाबत अपेक्षा ठेवणे
४. नकारात्मक चर्चा करणे

परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांचे शिक्षक होण्याची भूमिका पार पाडावी. शिक्षक मुलांना कायम सकारात्मक दृष्टिकोन देत असतात. पालकांनीही मुलांवर कोणत्याही अपेक्षा न लादता त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा. निकालाची चिंता न करता केवळ पेपर चांगले देण्याकडे लक्ष द्यावे. पालकांनी वेळ काढून सतत मुलांसोबत राहून त्यांना मानसिक आधार देणे आवश्यक आहे.
- विजय कचरे, शिक्षक समुपदेशक, डॉ. सायरस पुनावाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज