ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

पुणे, ता. १८ : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव व चिन्ह देण्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांना भिडले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी, बाचाबाची झाली. त्यानंतर हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत पोचला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना बाजूला नेल्याने या वादावर पडदा पडला. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार भवनासमोर घडला.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत शिवसेना नाव व त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी एका वृत्तवाहिनीने शहरातील ठाकरे गटाचे संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले. तसेच शिंदे गटाच्या संजय अगरवाल, अजय भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही बोलाविण्यात आले. दरम्यान, दोन्ही गटांचे शहर पातळीवरील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पत्रकार भवन येथे जमले. त्यावेळी आतापर्यंतच्या प्रकारामुळे अगोदर संतप्त असलेल्या ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रागात भर पडली. शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. काही वेळातच हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत पोचला. दरम्यान, मोरे, थरकुडे यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दूर नेल्यानंतर हा वाद निवळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com