
शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनावर ठाम
पुणे, ता. १९ ः राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, मागण्यांवर चर्चाही करण्यात आली. मात्र कोणतेही लिखीत आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे सोमवार (ता. २०)पासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने दिली आहे.
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्यांची थकबाकी, एक हजार ४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, आदी मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन करत आहे. गुरुवारी (ता. १६) एक दिवसाचा लाक्षणीक संप करत राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. आंदोलनात विद्यापीठ कर्मचाऱ्यांसह शहरातील सर्वच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. पर्यायाने परीक्षेचे कामकाजही काहीअंशी बाधीत झाले होते.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या होत्या. त्यावेळी विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर महासंघाने या बैठकीतील इतिवृत्त आणि लेखी आश्वासन देण्यात यावे, या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले होते. विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी संघटनेच्या हाती शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सरकारकडून इतिवृत्त देण्यात आले, मात्र तीन मागण्यांचा अपवाद वगळता इतर अनेक मागण्यांवर ठोस आश्वासन नसल्याने सरकारकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत संघटनांनी विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
--------------
राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या इतिवृत्तांतात ठोस आश्वासन देण्यात आले नाही, तसेच आमच्या मागण्यांना लेखी आश्वासन अजूनही प्राप्त झाले नाही. त्यामुळे सोमवार (ता. २०) पासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम आहोत.
- डॉ. सुनील धिवार, उपाध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समिती
------------