
शहर परिसरात वातावरण शिवमय
पुणे, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना आणि गणेश मंडळांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी :
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख, एस. ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख, असिफ शेख, शाहीद शेख, बबलू सय्यद यांनी सहभाग घेतला. एकूण नऊ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
--
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी :
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काँग्रेस भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘छत्रपती शिवराय रयतेचे राजे’ या विषयावर थोपटे यांनी मनोगत व्यक्त केले. विजय खळदकर, रामदास मारणे, द. स. पोळेकर, सुरेश नांगरे, विकास देशपांडे, ज्योती परदेशी, समीर वर्तक, अमर नाणेकर, अनिल चौगुले, विलास साळवी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
श्री शिवाजी मराठा सोसायटी :
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल दीड हजार विद्यार्थी पारंपारिक वेशात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे समूहगान केले. शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, रवींद्र धंगेकर, सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियमक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार, कमल व्यवहारे, बाळासाहेब गायकवाड, माधव पवार यावेळी उपस्थित होते.
डॉ. सायरस पूनावाला कन्या शाळा :
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला कन्या शाळेमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात पार पडला. उपमुख्याध्यापिका स्नेहलता घाटगे आणि पर्यवेक्षिका शैला पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या ४० विद्यार्थिनींनी महाराजांविषयीची भाषणे, पोवाडे, घोषणा, गाणी उत्स्फूर्तपणे सादर करून शाळेचा परिसर दणाणून टाकला. उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली.
महाराजांच्या पराक्रमाला सीझन मॉलमध्ये उजाळा :
ढोल-ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध, मावळ्यांच्या वेशातील तरुणाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी महाराजांची देखणी मूर्ती, आलिशान शामियाना, हजारो फुलांची आरास, फुलांची तोरणे विविध उपक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हडपसर, मगरपट्टा येथील सीझन मॉलमध्ये उत्साहात साजरी केली.