
छायाचित्रकाराला लुटणारे चोरटे अटकेत
पुणे, ता. १९ : छायाचित्रकाराला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, स्मार्ट वॉच चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरलेला मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर हा प्रकार घडला होता.
अमित प्रकाश इंगोले (वय १९) आणि सागर सुनील सांगडे (वय २१, दोघे रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २६ वर्षीय छायाचित्रकार तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा तरुण नगर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. त्या वेळी इंगोले आणि सांगडे यांनी त्याला अडवून धमकावले. त्याच्याकडील मोबाईल आणि स्मार्टवॉच काढून तेथून पसार झाले. पसार झालेले चोरटे मंत्री आयटी पार्क परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी तरुणाला लुटल्याची कबुली दिली.