वीणा गोखले यांना परिख पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीणा गोखले यांना परिख पुरस्कार प्रदान
वीणा गोखले यांना परिख पुरस्कार प्रदान

वीणा गोखले यांना परिख पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

वीणा गोखले यांना परिख पुरस्कार प्रदान
पुणे, ता. १९ ः सुश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापनदिन परिख पुरस्काराचे वितरण आणि गझलच्या सूरमयी वातावरणात पार पडला. यावेळी ‘देणे समाजाचे’ या उपक्रमात सातत्य राखणाऱ्या आणि अनेक सामाजिक संस्थांना विस्तारण्याची संधी देणाऱ्या वीणा गोखले यांना ‘आपलं घर’चे संस्थापक विजय फळणीकर यांच्या हस्ते ‘परिख पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणानिमित्त त्यांच्या छोटेखानी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, तसेच वर्धापनदिनानिमित्त शिरीष-गौरी आणि सृजन कुलकर्णी यांच्या गझल
गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. विविधरंगी गझलांची बांधणी उलगडत, त्याविषयी भाष्य करत या त्रिकुटाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैभव रांजणगावकर, जान्हवी ओक यांनी
परिश्रम घेतले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, दत्तप्रसाद रानडे, ल. म. कडू, हर्षा मुळे, पूर्वा म्हाळगी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता त्रिपाठी यांनी केले.
----
वीणा कुलकर्णी लिखित कथासंग्रहाचे प्रकाशन
पुणे, ता. १९ ः ‘प्रत्येकात एक लेखक दडलेला असतो. या लेखकाने आपल्या मनातील विचार कागदावर लिहिले, म्हणजे कथा-कविता या रुपाने ते व्यक्त होतात. त्यामुळे लिहायला सुरूवात केल्यानंतर अखंड लिहीत राहावे,’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांनी व्यक्त केले. वीणा कुलकर्णी लिखित ‘रुबिक क्यूब’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, गायिका चारूशीला बेलसरे, राजेंद्र कुलकर्णी, वीणा कुलकर्णी यांच्या मातोश्री सरला जोशी, आर. व्ही. कामत, प्रकाशक सीमा शिंदे आदी उपस्थित होते. ‘मनाचे मौन आणि अवतीभवती घडणाऱ्या घटनांच्या निरीक्षणांतून या कथा जन्मल्या. त्या वाचकांना आपल्याशा वाटतील, असा मला विश्वास वाटतो’, असे वीणा कुलकर्णी यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनंत जोशी यांनी केले.
-----
‘शिव अर्चना’ या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे, ता. १९ ः कर्वेनगर येथील शंकर देवस्थानातर्फे महाशिवरात्रीनिमित्त किराणा घराण्याचे प्रतिभावंत गायक पं. यादवराज फड यांचा भगवान शंकरावरील रचनांचा ‘शिव अर्चना’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पंचपदीने झाली. त्यानंतर ‘हरि हरा भेद, नाही नका करू वाद’, ‘शिव भोळा चक्रवर्ती’, ‘भजन करी महादेव, राम पुजी सदाशिव’ आदी रचना पं. फड यांनी सादर केल्या. ‘विष्णू आणि शंकर यांच्यात भेद नसून हर आणि हरि, असा एकाच वेलांटीचा फरक आहे. आपण दोन्ही देव एक समजून भक्ती केली पाहिजे’, असे सार्थ निरूपण त्यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘पायाच्या प्रसादे’ या भैरवीतील रचनेने झाली. त्यांना तबल्यावर विशाल मोरे, संवादिनीवर अमोल मोरे, मृदंगावर प्रसन्न बराटे, टाळावर आनंद टाकळकर आणि स्वरसाथ सुनील पासलकर यांनी केली. याप्रसंगी देवस्थानचे प्रमुख काका बराटे, शंकर आघाव, हेमंत ढमाले, प्रसाद पांडे, कमलाकर पिंपळगावकर, अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते.