कात्री घुसलेला डोळा वाचविण्यात यश

कात्री घुसलेला डोळा वाचविण्यात यश

पुणे, ता. १९ : जेमतेम सात वर्षांचा मुलगा हातात कात्री घेऊन घरात पळत होता. पळता-पळता पायात पाय अडकून पडला. त्या क्षणी हातातील कात्री थेट डोळ्यात आरपार घुसली. खालच्या पापणीतून आतमध्ये शिरलेली कात्री डोळ्याच्या वरच्या खोबणीतून बाहेर पडली. या मुलाला तातडीने कोल्हापूरवरून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याची दृष्टी वाचविण्यात रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञांना यश आले.
ससून रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील सहायक प्रा. डॉ. सतीश शितोळे म्हणाले, ‘‘रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरवातीलाच मुलाच्या डोळ्याचा सिटी स्कॅन करण्यात आला. कात्रीचा तुकडा डोळ्यात अडकला नसल्याची खात्री या सिटी कॅनमधून केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णाला पूर्ण भूल देऊन डोळ्याची शस्त्रक्रिया केली. सध्या यातून डोळ्याची ३० टक्के दृष्टी वाचविण्यात यश आले आहे.’’
डोळ्याअंतर्गत झालेल्या दुखापतीवर उपचार करून कात्रीमुळे कापली गेलेली खालची आणि वरची पापणी टाके घालून शिवली. शस्त्रक्रियेनंतर सहा दिवस रुग्णाची बारकाईने तपासणी करून, डोळ्यात होणारी सुधारणा प्रत्येक वेळी नोंदण्यात आली, असे डॉ. शितोळे यांनी सांगितले.

वेळेत शस्त्रक्रियेला महत्त्व
कात्री लागल्याने फाटलेल्या डोळ्यावर वेळेत शस्त्रक्रिया होणे महत्त्वाचे होते. ही शस्त्रक्रिया तातडीने केली नसती तर, डाव्याची ‘रिॲक्शन’ उजव्याला येते. त्यातून रुग्णाचा दुसऱ्या डोळ्याची नजरही कमजोर होण्याचा धोका असतो. तसेच, दुखापत झालेला डोळा सुकून जातो. त्यातून रुग्णाचा चेहरा विद्रूप दिसतो. मुलगा फक्त नऊ वर्षांचा असल्याने त्याच्या भविष्याचा विचार करून तातडीने शस्त्रक्रिया करणे महत्त्वाचे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या शस्त्रक्रियेसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. संजीवनी अंबेकर यांनी मार्गदर्शन केले.

रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर दोन वेळे ते पाठपुराव्यासाठी पुण्याला आले. पण, त्यानंतरचे कोल्हापूरमधील सरकारी रुग्णालयात ते आता डोळा दाखवत आहेत. या शस्त्रक्रियेमुळे एका मुलाची दृष्टी काही अंशी वाचविण्यात यश आले.
- डॉ. सतीश शितोळे, सहायक प्राध्यापक, नेत्ररोग विभाग, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचाराचे आशास्थान आहे. अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टर हे या रुग्णालयाचे बलस्थान आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या उपचारांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून रुग्ण येथे येतात.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com