
पुलावरून उडी घेणारी तरुणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावली
पुणे, ता. २० : नैराश्यातून एका २४ वर्षीय तरुणीने पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु वाहतूक पोलिस आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे ही तरुणी बचावली. ही घटना मुंबई-बंगळुरू मार्गावरील नवले पुलावर रविवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलावर रविवारी रात्री एक तरुणी जोरात ओरडत उभी होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वाहतूक पोलिस आणि नागरिकांनी धाव घेतली. वाहतूक पोलिस कर्मचारी मिथून राठोड, अमर कोरडे, तसेच नागरिक राजू जगताप, प्रदीप जोरे, श्रेयस तांबे आणि सागर बर्दापुरे यांनी त्या तरुणीला उडी घेऊ नको, असे सांगत बराच समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ती कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून नवले पुलाजवळ असलेल्या एका हॉटेलमधून सतरंजी आणली. ते सतरंजी घेऊन खाली उभे राहिले, तर काही जण तिला वाचविण्याच्या उद्देशाने तिच्या दिशेने निघाले. शेवटी तिने पुलावरून उडी घेतली; परंतु पोलिस आणि नागरिकांनी खाली सतरंजी धरली होती, त्यावर ती पडली. या घटनेत तरुणीला किरकोळ दुखापत झाली असून, तिला रुग्णालयात दाखल केले आहे.