पुण्यात गुरुवारपासून भू-अर्थशास्त्र परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात गुरुवारपासून भू-अर्थशास्त्र परिषद
पुण्यात गुरुवारपासून भू-अर्थशास्त्र परिषद

पुण्यात गुरुवारपासून भू-अर्थशास्त्र परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) २०२३ ही भू-अर्थशास्त्र परिषद गुरुवार (ता. २३) ते शनिवार (ता. २५) पुण्यात पार पडत आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित परिषदेचे उद्‍घाटन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोरोना साथीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिषदेची संकल्पना ‘एशिया अ‍ॅन्ड द इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ ही आहे. गुरुवारी उद्‍घाटन सत्रात ज्येष्ठ शास्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थितांचे स्वागत करतील. तर यावेळी भूतानचे अर्थमंत्री लिओंपो नामगे शेरीन आणि मालदिवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर सहभागी होणार आहे, अशी माहिती परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. गौतम बंबावाले यांनी दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला पीआयसीचे अध्यक्ष डॉ. माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळकर उपस्थित होते. तीन दिवसीय परिषदेत परिषदेत मंत्री, धोरणकर्ते, औद्योगिक नेतृत्व, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ जागतिक व्यापार आणि अर्थतज्ज्ञ यांचा सहभाग असतो. परिषदेची सांगता शनिवारी (ता. २५) होत असून, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचे या सत्रात प्रमुख भाषण होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर असतील. विशेष निमंत्रितांसाठी हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे ही परिषद पार पडेल.

परिषदेचे आकर्षण
- ब्राझील, अमेरिका, तैवान, ब्रिटन, साऊथ आफ्रिका, भुतान, मालदिव, सिंगापूर आणि मेक्सिकोसह १२ देशांमधील ४४ वक्ते सहभागी होणार आहेत.
- जी २०चे अध्यक्षपदासाठी भारताचा दृष्टिकोन आणि ग्लोबल साऊथ ही संकल्पना जी २० कार्यक्रमाला कसा आकार देईल ही दोन महत्त्वाची सत्रे आहेत.
- या सत्रात गोखले राज्यशास्र व अर्थशास्त्र संस्थेचे डॉ. अजित रानडे हे भारताचे प्रमुख जी २० समन्वयक हर्षवर्धन श्रींगला यांच्याशी संवाद साधतील.
- यावेळी मुंबईतील ब्राझीलचे कौन्सुल जनरल जो डे मेंडाँको लिमा नेटो आणि मुंबईतील दक्षिण आफ्रिकेचे कॉन्सुल जनरल अँड्रिया क्युन हे चर्चासत्रात सहभागी होतील.
- इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांच्याशी ‘टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड टॅलेंट फॉर ग्लोबल सक्सेस’ या विषयावर फायर साइड चॅट संवाद. पीआयसीचे विश्वस्त डॉ. गणेश नटराजन हे त्यांच्याशी संवाद साधतील.