पहाटे गारठा, दिवसा उन्हाचे चटके

पहाटे गारठा, दिवसा उन्हाचे चटके

पुणे, ता. २० ः पुण्यात दिवसा उन्हाच्या झळा तर, रात्री व पहाटे थंडी असे चित्र कायम आहे. कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा होत असलेली चढ-उतार यामुळे मोठी तफावत पाहायला मिळत आहे. दरम्यान, कमाल तापमानाचा पारा वाढल्याने सध्या उन्हाळ्याच्या हंगामासारखी परिस्थिती झाली आहे. आठवडाभर शहर आणि परिसरातील कमाल तापमानात वाढ अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

शहरात सोमवारी १०.५ अंश सेल्सिअस किमान आणि ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सलग दहा दिवस कमाल तापमान हे ३४ अंश व त्या पुढे नोंदले गेले आहे. त्यात किमान तापमानाचा पारा मागील आठवड्याभरापासून सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे थंडी आणि उन्हाचे चटके असा दुहेरी अनुभव पुणेकरांना होत आहे.
राज्यात सध्या हीच स्थिती आहे. कमाल तापमानातील वाढ कायम असून सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ३८.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर नीचांकी तापमान जळगावला १०.३ अंश सेल्सिअस होते. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. तसेच पुणे जळगाव आणि निफाड वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान१५ अंशांच्या पुढे पोचले आहे.

मागील दहा वर्षांतील उच्चांकी तापमान
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांची आकडेवारी पाहता राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३९.४ अंश सेल्सिअस होते. तर रत्नागिरीत हे मागील दहा वर्षांमधील फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी तापमान होते. तर विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ३६ अंशांच्या दरम्यान होता.

यंदा फेब्रुवारी उष्ण!
हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिना अधिक उष्ण ठरला आहे. सध्या राजस्थान गुजरातला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रावरील विरोधी चक्रावाताच्या (अँटीसायक्लोनिक) प्रभावामुळे पुणे व परिसरावर पूर्वेचे वारे वाहत आहेत. परिणामी, शहरात कमाल तापमानात चांगलीच वाढ होत असून, यंदा फेब्रुवारी महिन्यात (१ ते १९ फेब्रुवारीपर्यंत) गेल्या वर्षीच्या तुलनेत पेक्षा १.६४ अंश सेल्सिअस अधिक उष्ण ठरला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी शास्त्रज्ञ व ‘टायफून रिसर्च सेंटर’ येथे कार्यरत विनीत कुमार यांनी दिली.

येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे
सोलापूर ः ३६.४
परभणी ः ३५.७
ठाणे ः ३६
जालना ः ३६
औरंगाबाद ः ३५.४
नाशिक ः ३६.३
जळगाव ः ३७.५
नांदेड ः ३६.८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com