‘रोहयो’च्या कंत्राटी कर्मचारी भरतीचे अधिकार ‘सीईंओं’कडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रोहयो’च्या कंत्राटी कर्मचारी 
भरतीचे अधिकार ‘सीईंओं’कडे
‘रोहयो’च्या कंत्राटी कर्मचारी भरतीचे अधिकार ‘सीईंओं’कडे

‘रोहयो’च्या कंत्राटी कर्मचारी भरतीचे अधिकार ‘सीईंओं’कडे

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः रोजगार हमी योजनेसाठीचे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरतीचे अधिकार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) प्रदान करण्यात आले आहेत. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. यामुळे रोजगार हमी योजनेचा निधी वेळेत खर्च होऊ शकणार आहे.

गावपातळीवरील रोजगार हमी योजनेची कामे करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान दहा ते कमाल १५ कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर काम करत असतात. यामध्ये प्रत्येकी एक सहायक कार्यक्रम अधिकारी, दोन तांत्रिक सहायक, दोन लेखनिक कम डाटा एंट्री असिस्टंट, किमान एक शिपाई, वाहनचालक आणि विभागनिहाय प्रत्येकी एक तांत्रिक सहायक (उदा. कृषी, वन विभाग आदी) आदी पदांचा समावेश असतो. हे कर्मचारी भरतीचे अधिकार आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना होते. त्यामुळे यासाठी तालुका पातळीवरून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा लागे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा लागत असे. यामुळे रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेतच बराच वेळ जात असे आणि परिणामी रोजगार हमी योजनेची कामे प्रलंबित राहत असत, परंतु आता ही रिक्त पदे वेगाने भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.