आम्हाला संपत्तीचा मोह नाही ः मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्हाला संपत्तीचा मोह नाही ः मुख्यमंत्री
आम्हाला संपत्तीचा मोह नाही ः मुख्यमंत्री

आम्हाला संपत्तीचा मोह नाही ः मुख्यमंत्री

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः ‘‘शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाने गुणवत्तेच्या आधारावर दिला आहे. आम्हाला कोणत्याही संपत्ती, प्रॉपर्टीचा मोह नाही. ज्यांना मोह झाला, त्यांनी २०१९ला चुकीचे पाऊल उचललं. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत, त्याचा वारसा पुढे नेणार आहोत. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले, ‘‘लोकशाहीत निवडणूक आयोग, न्यायालय स्वायत्त आहेत, त्यांना घटना, कायदा आहे. जर निर्णय आपल्या बाजूने लागला तर न्यायव्यवस्था, आयोग चांगला आहे आणि निकाल विरोधात गेल्यावर त्यावर आरोप करायचे हे योग्य नाही. हा निर्णय गुणवत्तेवर दिला आहे. लोकसभा व विधानसभेत आमच्याकडे ७३ टक्के बहुमत आहे. अनेक प्रतिज्ञापत्रही दाखल झाले. नियमानुसार निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. तसेच एमपीएससीच्या अध्यक्षांना पत्र देऊन २०२५ नंतर नवीन पॅटर्न लागू करण्याचे सांगितले आहे. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्यासोबत जी घटना घडली त्याचे सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत, चव्हाण यांना सुरक्षा पुरविली जाईल.’’

ब्राह्मण समाज नाराज नाही
कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेली, मराठा, सोनार, ब्राह्मण, ख्रिश्‍चन, पंजाबी, शिंपी यासह इतर समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. कसब्यातील जुने वाडे, वाहतूक, पार्किंग, भिडे वाडा या प्रश्‍नांवर चर्चा झाली. या निवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज नाही, तो महायुतीला मतदान करेल. हा समाज नाराज असल्याचे विरोधकांकडून पसरवले जात आहे. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ल्या आहे. विधान परिषदेपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. त्यात साडेचार हजार पेक्षा जास्त थेट ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. ट्रेंड बघायचा असेल तर ग्रामपंचायतीचा बघा, कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असे शिंदे यांनी सांगितले.