जमीन मोजणीला येणार गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन मोजणीला येणार गती
जमीन मोजणीला येणार गती

जमीन मोजणीला येणार गती

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : भूमी अभिलेख विभागाकडे मार्च अखेरपर्यंत पाचशे मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जमिनी मोजणीच्या कामाला गती येणार आहे. परिणामी प्रलंबित असलेली जमीन मोजणीची हजारो प्रकरणे निकाली काढणे शक्य होणार आहे.
जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यभरात ७७ अधिक स्थानके (कॉर्स) उभारली आहेत. रोव्हर मशिनच्या आधारे या कोर्सच्या माध्यमातून जीपीएसद्वारे जमिनीची मोजणी केवळ ३० सेकंदात घेता येणार आहे. ही मोजणी रोव्हरमध्ये (यंत्र) संकलित झाल्यानंतर टॅबमध्ये ती माहिती लगेच मिळणार आहेत. जमीन मोजणीसाठी सध्या ‘ईटीएस’ यंत्राच्या मदतीने करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश निश्‍चित केले जातात. त्या आधारे मोजणीचे काम केले जाते. या पद्धतीमध्ये मोजणी करण्यास किमान एक तास ते चार तास लागतात.
यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘‘मोजणी यंत्रांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार मार्चअखेरीस ५०० रोव्हर प्राप्त होतील. त्यामुळे एप्रिलपासून जमिनींच्या प्रलंबित मोजण्या निकाली काढणे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत प्रलंबित मोजण्या ३१ डिसेंबरपर्यंत, तर सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या प्रलंबित मोजण्या ३१ मार्च २०२३ पर्यंत निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.’ पुणे जिल्ह्यात मोजणीसाठी दर महिन्याला सुमारे ३ हजार प्रकरणे दाखल होतात.