विमान प्रवाससाठी ‘डीजी यात्रा’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान प्रवाससाठी ‘डीजी यात्रा’!
विमान प्रवाससाठी ‘डीजी यात्रा’!

विमान प्रवाससाठी ‘डीजी यात्रा’!

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना ‘चेक-इन’साठी ओळखपत्र घेऊन रांगेत थांबण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण पुणे विमानतळांवर एक मार्चपासून ‘डीजी यात्रा’ ही मोबाईलवर आधारित सेवा सुरु आहेत. प्रवाशांना बोर्डिंग पास सह अन्य महत्त्वाची कागदपत्रे याच ॲपवर उपलब्ध होत असल्याने प्रवाशांसाठी ते प्रत्यक्ष दाखविण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय प्रवाशांच्या चेहऱ्याची नोंद देखील आधीच या ॲपमध्ये झाली असल्याने प्रवाशांचा चेहरा हा आपल्या ‘बोर्डिंग पास’ प्रमाणे काम करेल. प्रवासी त्या कॅमेऱ्यासमोर येताच त्याची सर्व माहिती जमा होणार आहे. मागील वर्षापासून पुणे विमानतळावर सुरु असलेली चाचणी यशस्वी झाली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ‘डीजी यात्रा’ योजना सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दिल्ली, वाराणसी, बंगळूर येथे ही योजना प्रायोगिक तत्त्वावर काही महिन्यांपूर्वी सुरू केली. प्रवाशांचे विमानतळावर स्वयंचलित मशिनद्वारे फोटो (स्कॅनिंग) काढण्यात येतो. त्याच वेळी तिकीट स्कॅन केले जात आहे. फक्त एवढे करून प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश मिळत आहे. दिल्लीसह अन्य ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे हवाई वाहतूक मंत्रालयाने देशातील अन्य शहरांत ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यात पुणे, हैदराबाद, कोलकता आणि विजयवाडा विमानतळाचा देखील समावेश करण्यात आला. ही सुविधा ऐच्छिक असणार आहे. ज्या प्रवाशांना बोर्डिंग पास वर प्रवास करायचे आहे. त्यांच्यासाठी तो पर्याय देखील खुला असेल.

अॅप कसे वापरावे?
- डीजी यात्रा ही मोबाईल अॅप केंद्रित प्रणाली आहे. प्रवाशांना आधारित पडताळणी वापरून डीजी यात्रा अॅपवर त्यांचे तपशील नोंदवावे लागतील.
- त्यानंतर सेल्फी अपलोड करावा लागेल. ॲप वापरादरम्यान, प्रवाशाचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील.
- डीजी यात्रा अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशाला चेक-इनसाठी वेळ लागणार नाही.
- त्या ठिकाणी प्रवाशांचा चेहरा स्कॅन केल्यानंतर, यंत्रणेत संबंधित प्रवाशांनी विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याची नोंद होईल.
- त्यानंतर प्रवासी ‘सिक्युरिटी चेक-इन’ करताना सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्सचे जवान संबंधित प्रवाशाचे स्‍कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी करतील.
- या प्रणालीद्वारे बनावट तिकीट किंवा दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवेश करू पाहणाऱ्यांना रोखता येणार आहे.

याचा फायदा काय?
१. डीजी यात्रा ही सुविधा सुरु झाल्यावर प्रवाशांना रांगेत थांबावे लागणार नाही.
२. प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.
३. अवघ्या एक ते दोन मिनिटात प्रवासी ही सर्व प्रक्रिया पार पाडेल.
४. ‘सीआयएसएफ’ वरचा ताण हलका होईल.


प्रवाशांच्या दृष्टीने ‘डीजी यात्रा’ ही फायदेशीर ठरणार आहे. प्रवाशांना प्रवेशाच्या ठिकाणापासून ते बोर्डिंगपर्यंत विना अडथळा जाता येईल. मात्र त्यात कोणताही तांत्रिक बिघाड येता कामा नये.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

विमानतळांवर ‘डीजी यात्रा’ची चाचणी सुरु आहे. एक मार्चपासून सेवा सुरु होत आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होण्यास मदत मिळणार आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे