
पुण्यात होणार ‘मारवाडी हॉर्स शो’
पुणे, ता. २२ ः पुण्यातील अश्वप्रेमींना अतिशय देखणी आणि लढाऊ अशा स्वदेशी प्रजात असणारे मारवाडी घोडे पाहण्याची संधी मिळणार आहे. निमित्त आहे, इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘मारवाडी हॉर्स शो’ या स्पर्धेचे. रेसकोर्स येथे शनिवार (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) ही स्पर्धा पार पडेल.
घोड्यांच्या वयोगटानुसार सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये मिल्क टीथ फिली, मिल्क टीथ कोल्ट, टू टीथ फिली, टू टीथ कोल्ट, मेअर ॲण्ड स्टॅलिअन या प्रकारातील नर आणि मादी अश्वांचा समावेश असणार आहे. देशभरातून जवळपास १०० हून अधिक अश्व या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्रासहित पंजाब, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातून हे अश्व येणार आहेत. विभागानुसार, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अश्वांना रविवारी पुरस्काराने सन्मानित केले जाईल.