हुंड्यासाठी डोळ्यांत टाकले मिरची पावडर मिश्रित पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुंड्यासाठी डोळ्यांत टाकले
मिरची पावडर मिश्रित पाणी
हुंड्यासाठी डोळ्यांत टाकले मिरची पावडर मिश्रित पाणी

हुंड्यासाठी डोळ्यांत टाकले मिरची पावडर मिश्रित पाणी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : हुंड्यासाठी विवाहितेच्या अंगावर व डोळ्यांवर मिरची पावडर मिश्रित पाणी टाकून जळत्या लाकडाचे चटके दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी पतीसह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते २० फेब्रुवारी २०२३ यादरम्यान घडला. या संदर्भात एका २२ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यावरून पती नागेश कार्तिक साहेबन्ने (वय २३), रत्ना कार्तिक साहेबन्ने (वय ४२), महादेवी जाधव (वय ५८) आणि लिंबराज भिसे (वय ५८, सर्व रा. केळेवाडी, कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा नागेश याच्यासोबत ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरहून हुंड्याची रक्कम आणण्यासाठी तिला सतत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. आरोपींनी विवाहितेचे हातपाय बांधून मिरची पावडर मिश्रित पाणी तिच्या अंगावर आणि डोळ्यांत टाकले. त्यानंतर तिच्या अंगावर मिठाचे पाणी टाकून पेटलेल्या लाकडाने चटके दिले. त्यात विवाहित महिलेला दुखापत झाली आहे. या संदर्भात विवाहितेने पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधून तक्रार दिली. यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी पोचून तिला ससून रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे करीत आहेत.
------