काव्यशिल्पच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी

काव्यशिल्पच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी

काव्यशिल्प संस्थेच्या
अध्यक्षपदी मिलिंद जोशी
पुणे, ता. २२ ः कवितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘काव्यशिल्प’ या संस्थेतील २०२३ साठीच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक संस्थेच्या मासिक सभेत नुकतीच पार पडली. गतवर्ष हे संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. या वर्षात केलेल्या कार्याची दखल घेऊन सभासदांनी संस्थेच्या अध्यक्षपदी मिलिंद जोशी आणि सचिवपदी सुजाता पवार यांची फेरनिवड केली. मनोहर सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. बंडा जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुवर्ण महोत्सवी वर्षात आयोजित करण्याचे राहिलेले विशेष कार्यक्रम व उपक्रम यंदाच्या वर्षात सादर करण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने कवितेला समर्पित दोन दिवसीय संमेलन आयोजित करण्याचा मानस आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितले.

‘सूर निरागस हो’ मैफलीचे आयोजन
पुणे, ता. २२ ः दुर्गा महिला नागरी पतसंस्था, सहकारनगरतर्फे इमारत निधी संकलनासाठी ‘सूर निरागस हो’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अनघा राजवाडे व संजय मरळ यांनी यात विविध प्रकारची गीते सादर केली. सत्यम् शिवम सुंदरम, याद किया दिलने कहाँ हो तुम, लागा चुनरीमे दाग, दमा दम मस्त कलंदर आदी गीतांचा यात समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्षा धनदा पुरोहित यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता इनामदार यांनी केले. डॉ. अर्चना जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका उषा जगताप, स्मिता वस्ते, ज्येष्ठ समाजसेविका ॲड. शालिनी डबीर आदी उपस्थित होत्या.

मिनी मॅरेथॉनमधून स्वच्छतेचा संदेश
पुणे, ता. २२ ः मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक, पिंपरी चिंचवड यांच्यातर्फे आयोजित ‘स्वच्छ शहर, आधुनिक शहर’ यावर आधारित मिनी मॅरेथॉनमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे सातशे धावपटूंनी सहभाग नोंदवला. शहरामध्ये स्वच्छता तसेच आधुनिकतेचा जागर करून शहरवासियांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा हेतू या आयोजनामागे होता, असे प्राचार्या गीता जोशी यांनी सांगितले. मॅरेथॉनसाठी समन्वयक म्हणून संदीप घोगरे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी पद्मश्री पुरस्काविजेते मुरलीधर पेटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव, कार्यकारी संचालक तेज निवळीकर, प्राचार्य डॉ. रु. वि. भोरटक्के, प्रा. आर. आर. पंडित, एस. एन. बी. पी. शाळेचे क्रीडा विभागप्रमुख हेमराज थापा, सुमित थापा आदी उपस्थित होते.

व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान
पुणे, ता. २२ ः ‘रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट’तर्फे सार्थक सेवा संघाचे संस्थापक डॉ. अनिल कुडिया यांना २०२३ साठीचा ‘व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरंदर तालुक्यातील सार्थक सेवा संघ येथे झालेल्या समारंभात क्लबचे माजी अध्यक्ष वसंत वैशंपायन यांच्या हस्ते डॉ. कुडिया यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी मंदार गद्रे यांनी डॉ. कुडिया यांची मुलाखत घेतली. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष भाग्यश्री मिडे, प्रांतपाल संतोष मराठे व इतर रोटरी मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक कुलकर्णी यांनी डॉ. कुडिया यांचा परिचय करून दिला. विपीन घाटे यांनी आभार मानले.

‘स्वरफुले’ मध्ये बहारदार गायन
पुणे, ता. २२ ः दासनवमी उत्सवानिमित्त शनिवार पेठ येथील समर्थ मंदिर येथे ‘स्वरफुले’ हा भक्तिगीत व अभंग गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. गायिका डॉ. राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांनी ‘नमो गजानन नमो हनुमान’, ‘दासांची संपत्ती’, ‘येथे का रे उभा श्रीरामा’, ‘सेतू बांधा रे सागरी’ आदी रचना सादर केल्या. त्यांना तबल्यावर सिद्धिविनायक पैठणकर, संवादिनीवर रवींद्र काशीकर आणि तालवाद्यांवर मुकुंद जोशी यांनी साथसंगत केली. गजानन महाजनी यांनी निवेदन केले. हेमा माडीवाले, पंकज माडीवाले यांनी आयोजन केले.

‘स्वरसिद्धी’ संगीतसभेचे आयोजन
पुणे, ता. २२ ः लक्ष्मी रस्त्यावरील राघवेंद्र स्वामी मठ येथे गुरूवारी (ता. २३) सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत ‘स्वरसिद्धी’ या मासिक संगीतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राजश्री महाजनी व आनंद जोशी या वेळी शास्त्रीय व अभंग गायन सादर करतील. त्यांना उपेंद्र सहस्त्रबुद्धे, मोहन पारसनीस, तेजस जोशी, बाबासाहेब शिंदे आणि मुकुंद जोशी हे साथसंगत करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com