पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी ः शरद पवार
पुणे, ता. २२ : ‘‘ कसबा विधानसभा मतदार संघातील ही पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. ते योग्यच निर्णय घेतील,’’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. २२) व्यक्त केला.
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार पेठेतील जयराज भवनमध्ये व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार, डॉ. विश्वजीत कदम, विठ्ठल मणियार, महेंद्र पितलीया, दीपक बोरा, वालचंद संचेती, पोपटलाल ओसवाल, राजेश शहा, रवींद्र धंगेकर, उल्हास पवार, अंकुश काकडे आणि प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘ व्यापारी वर्ग हा देशाचा जाणकार वर्ग असून त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी कळते. मात्र, अर्थव्यवस्थेबाबत काहीही विचार न करता नको ते निर्णय घेतले जात आहेत. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. भारताचा नकाशा पाहिल्यास ६० टक्क्यांपेक्षा अधिक राज्ये भाजपच्या ताब्यात नाहीत. याचा अर्थ लोकांची मानसिकता भाजपला निवडून देण्याची नाही.’’ धंगेकर म्हणाले, ‘‘माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचे मला यापुढे सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे.’’
२६५१५, २६५१६