
भाजपकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ः नाना पटोले
पुणे, ता. २१ : ‘‘कसबा पोटनिवडणुकीसाठी दहशत निर्माण करून भाजपला उद्रेक करायचा आहे. पोलिसांनी हे रोखले पाहिजे. नाहीतर त्यावरील औषध आम्हाला माहिती आहे,’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये पटोले बोलत होते. माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, विश्वजीत कदम, बाळासाहेब शिवरकर, ओबीसीचे अध्यक्ष भानुदास माळी आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, ‘‘बहुजनांच्या नेत्यांचा उल्लेख केवळ राजकारणासाठी भाजप करत आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे आपलं दुर्दैव आहे. पुन्हा पेशवाई आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कसबा हा ऐतिसाहसिक भाग आहे. क्रांतिकारक येथून निर्माण झाले, त्यामुळे कसब्याची जनता या पोटनिवडणुकीतून क्रांतिकारी निकाल देणार आहे. जीएसटी अधिकाऱ्यांना घेऊन व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो निवडणूक आयोगाला दिला आहे. ही निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे.
दरम्यान, सकाळी धंगेकर यांच्या प्रचारार्थ लोहियानगर भागातून आमदार प्रणिती शिंदे यांनी पदयात्रा काढून मतदारांनी संपर्क साधला.
आचारसंहितेचा भंग
कार्यक्रमापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘ मते नाही, तर विकास कामांसाठी निधी नाही, असा दम पालकमंत्र्यांनी भरणे अशोभनीय आहे. हा आचारसंहितेचा भंग असून या प्रकरणी आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य करीत आहे. कोल्हापुरातही त्यांनी असे प्रकार केल्यामुळे त्यांना पुण्याला यावे लागले.’’
-------------
--