
प्रश्न सुटलेल्या पोटाचा उपाय ठरला फायद्याचा!
‘पोटात सगळं जातं, पण पोट आत काही जात नाही,’ या विचाराने संतोष अस्वस्थ होता. आपण सडपातळ झालो आहोत, अशी स्वप्नं तो दिवस-रात्र पाहू लागला. मात्र, आरशात पाहिल्यावर त्याला आरसा फोडावासा वाटायचा.
‘मी सडसडीत दिसेल’ असा एकही आरसा जगात नाही का? असा प्रश्न तो हताशपणे विचारायचा.
‘तुझ्या शेकडो चुका पोटात घेतल्यामुळेच माझं पोट सुटलंय,’ असं एकदा तो रागिणीला म्हणाला आणि त्यानंतर रागिणीने रणरागिणीचा अवतार धारण केला.
‘‘माझ्या चुका? तुमच्या जिभेला काही हाड आहे का? आधी तुम्ही जिभेवर ताबा मिळवा. सारखं चटपटीत खायला पाहिजे. मग पोट सुटेल नाहीतर काय होईल.’’ रागिणीने म्हटले.
‘‘मन आणि जिभेवर माझा ताबा आहे पण तू जास्तीचा स्वयंपाक करतेस आणि ‘एवढं वाया घालवायचं का?’ असा प्रश्न विचारून, मला बळजबरीने खायला घालतेस. त्यामुळेच माझं पोट सुटलंय.’’ संतोषने जुन्या आठवणींना उजाळा दिला.
‘‘खाऊन माजावं पण टाकून माजू नये, अशी एक म्हण आहे. अन्न कधी वाया घालवू नये, या संस्कारात मी वाढलेली आहे. त्यामुळे अन्नाचा एक कणही मी वाया घालवू देणार नाही.’’ रागिणीने म्हटले.
‘‘अगं पण तुझ्या हट्टापायी माझं पोट सुटलंय ना. त्याचं काय?’’ संतोषने रागाने म्हटले.
‘‘तुमचं तुम्ही बघा.’’ असे म्हणून रागिणीने हात झटकले.
पोट सुटल्यामुळे संतोषचा आळशीपणाही वाढू लागला होता. आॅफिसला तो दररोज उशीरा पोचत होता. यावरून साहेबांनी त्याला
चांगलंच फैलावर घेतले.
‘‘साहेब, पगार कमी असल्यामुळे माझ्याकडे गाडी नाही. त्यामुळे मी रोज पीएमटीने येतो.’’ संतोषने खुलासा केला.
‘‘तुम्ही पीएमटीने या नाहीतर हेलिकॉप्टरने या. उशिरा येण्याशी त्याचा काय संबंध.?’’ साहेबांनी रागाने विचारले.
‘‘साहेब, पीएमटी बसस्टॉपला कधीच थांबत नाही. ती मागे किंवा पुढे थांबते. त्यामुळे सगळेजण पळत जाऊन, बसमध्ये जागा मिळवतात पण माझ्या पुढे आलेल्या पोटामुळे मला पळता येत नाही. रोज दहा- बारा बस अशा सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे मला रोज उशीर होतो.’’ संतोषने म्हटले.
‘‘अहो मग पोट कमी करा ना. का ते कामसुद्धा तुमच्या आॅफिसमधील सहकाऱ्यांनी करायचं.’’ साहेबांनी कुत्सितपणे म्हटले.
‘‘साहेब, मी खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही.’’ संतोषने म्हटले.
‘‘पण तुमचं पोट का सुटलंय, याचं काय कारण आहे.?’’ साहेबांनी म्हटलं.
‘‘साहेब, पगार कमी असल्यामुळे माझ्याकडे फ्रीज नाही.’’ संतोषने म्हटले.
‘‘फ्रिज नसण्याचा आणि पोट सुटण्याचा काय संबंध?’’ साहेबांनी रागाने म्हटले.
‘‘साहेब, फ्रिज नसल्यामुळे रात्री जो स्वयंपाक केला जातो, तो सगळा खावा लागतो. आम्हाला शिल्लक ठेवता येत नाही. त्यामुळे माझे पोट सुटलंय.’’ संतोषने म्हटले.
‘‘बरं मी काय करू?’’ साहेबांनी म्हटलं.
‘‘साहेब, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे माझा पगार वाढवणे. तसं झाल्यास मी गाडी आणि फ्रिज विकत घेऊ शकतो. जिमला जाऊ शकतो. सकस खाऊ शकतो. त्यामुळे उशिरा येण्याचं काही कारणच नाही.’’ संतोषने आपला मुद्दा पटवून दिला. साहेबांनाही तो पटला. त्यांनी त्याला तातडीने पगारवाढ दिली.
पोट सुटल्यामुळेच आपल्याला पगार वाढला, या विचाराने संतोषच्या अंगावर मूठभर मांस चढले. वाढलेल्या पोटामुळे पगारही वाढू शकतो, या कल्पनेच तो खुश झाला.