
एमपीएससी आंदोलन कोट
एमपीएससीच्या ट्वीटनंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष
पुणे, ता. २३ : सलग चार दिवसांच्या आंदोलनामुळे बालगंधर्व रंगमंदिरासमोरील विद्यार्थी काहीसे निराश झाले होते. परंतु, गुरुवारी (ता. २३) दुपारी पाच वाजून १० मिनीटांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक ट्वीट केले आणि एकच जल्लोष झाला. मागील सात महिन्यांपासून जो लढा विद्यार्थ्यांनी दिला, त्याला यश आले होते.
राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा म्हणून उमेदवारांनी सोमवार (ता. २०)पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी उमेदवारांची भेट घेत सांत्वन केले. मात्र, स्वायत्त असलेल्या एमपीएससीने काहीशी कठोर भूमिका घेतल्याने अनेकांना वाट पाहावी लागली. अखेरीस ट्वीट करत आयोगाने भूमिका स्पष्ट केली.
एमपीएससी म्हणते, ‘‘राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेता सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.’’
आंदोलक विद्यार्थ्यांशी आम्ही फोनवर चर्चा केली होती. शासनदेखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होते. एमपीएससीला नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला कुठलेही राजकीय श्रेय घ्यायचे नाही. काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते. खरेतर नवा पॅटर्न २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात झाला होता. विद्यार्थी नवीन अभ्यासक्रम रद्द करावा, अशी मागणी करत नव्हते. तर त्यांना फक्त वेळ पाहिजे होता. आयोग स्वायत्त आहे. त्यांनी विनंतीला मान देत निर्णय घेतला.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो, की कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमपीएससीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना जुळवून घेण्यासाठी योग्य वेळ मिळाला आहे. तसेच, वर्णनात्मक पद्धत २०२५ पासून लागू करून केंद्रीय लोकसेवा आयोगात टक्केवारी वाढविता येईल. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे आयोगाने हिताचा निर्णय घेतला आहे.
- मारोती गायकवाड, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
संभ्रमावस्था दूर केल्याबद्दल एमपीएससीचे आभार. अभ्यासक्रमासाठी नवीन समिती बनवावी. ज्यात वैकल्पिक विषय, एक हजार गुणांची मर्यादा आणि मुलाखतीच्या १०० गुणांबद्दल चर्चा व्हावी.
- सुभाष शेळके, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी