
डॉ. दाभोलकरांचा जीवनपट उलगडणारे कला प्रदर्शन रविवारपासून
पुणे, ता. २३ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जीवनपट आणि त्यांच्या हत्येनंतर घडलेला घटनाक्रम मांडणारे कला प्रदर्शन ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मार्फत आयोजित करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन पार पडेल. त्याचे उद्घघाटन रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होर्इल. या पाचही दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘विज्ञानाने मला काय दिले’ या पुस्तकाचे प्रकाशन २८ फेब्रुवारीला विवेक सावंत यांच्या हस्ते होईल. एक मार्चला प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी गिरीश सहस्रबुद्धे हे संवाद साधणार आहेत, तर दोन मार्चला चित्रकार राजू सुतार व गणेश विसपुते यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल.
डॉ. दाभोलकर यांची हत्या आणि त्याचा तपास, डॉ. दाभोलकर यांचा व्यक्तिपरिचय, चळवळ, प्रबोधन आणि परिवर्तन या पाच भागांत हे प्रदर्शन विभागले आहे, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीपाल ललवाणी आणि नंदिनी जाधव यांनी दिली.