
राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा समारोप
राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा समारोप
पुणे, ता. २४ ः ‘हिंदयान’ दिल्ली ते पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची राष्ट्रीय सायकल स्पर्धा नुकतीच पार पडली. दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथून प्रारंभ झालेल्या १३१८ किलोमीटरच्या स्पर्धेचा समारोप पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे झाला. परभणीचे विष्णुदास चपके यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमारे ५०० सायकलपटू सहभागी झाले होते. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांतून स्पर्धेचा प्रवास झाला. भारतीय नौसेना, सेना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विविध राज्यांतील जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.
स्त्री आधार केंद्रातर्फे शनिवारी कार्यक्रम
पुणे, ता. २४ ः जागतिक महिला आयोगातर्फे ६७ व्या सत्राचे आयोजन ६ ते १७ मार्च दरम्यान करण्यात आले असून स्त्री आधार केंद्राने सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून महिलांच्या सहभागाची चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. याअंतर्गत उद्या (ता. २५) पुण्यात एक चर्चासत्र पार पडणार आहे. या वेळी ‘ग्रामीण भागात महिलांच्या अत्याचार विरोधी संघर्षात समाज व पोलिसांकडून अपेक्षा’ या विषयावरील अनुभवांची मांडणी विविध सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञ वक्त्यांकडून करण्यात येणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील विद्यार्थी सहायक समितीच्या सभागृहात दुपारी ३ ते ४.३० या वेळात हा कार्यक्रम पार पडेल.
हसरत जयपुरी व शैलेंद्र यांना मानवंदना
पुणे, ता. २४ ः हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार हसरत जयपुरी व शैलेंद्र यांना जन्मशताब्दीनिमित्त मानवंदना देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरसाज व पृथ्वीराज थिएटर प्रस्तुत या कार्यक्रमात या दोन गीतकारांची निवडक २८ अजरामर गीते सादर होतील. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ५ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वरसाज संस्थेने केले आहे.
जिम्नॅस्ट साहिल मरगजेचा गौरव
पुणे, ता. २४ ः मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात महाविद्यालयातील विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यात आंतरमहाविद्यालयीन जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल जिम्नॅस्ट साहिल मरगजेचा अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र गौरव करण्यात आला. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. भाऊसाहेब जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, क्रीडा संचालक डॉ. मुरलीधर गायकवाड उपस्थित होते. साहिल मागील दहा वर्षांपासून जिम्नॅस्टिकचा सराव करत असून त्याने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हलचे आयोजन
पुणे, ता. २४ ः इन्फोसिस फाउंडेशन आणि भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय ‘इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २६) सकाळी १० ते दुपारी १ आणि सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६ वाजता या फेस्टिव्हलमधील नृत्य सादरीकरणे सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात होणार आहेत. फेस्टिव्हलचे उद्घाटन नृत्य गुरु शांभवी दांडेकर यांच्या उपस्थितीत होणार असून हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.