
‘पीएमपी’मुळे झाले काम सर्वांना मिळाले जीवदान!
काश्मीरला जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरड कोसळल्यामुळे बसमधील चालकासह सगळे प्रवासी भयभीत झाले. मागे फक्त दोन फूट जागा शिल्लक राहिली होती. त्यामुळे मागे परतायचा दोरही कापला गेला होता. डाव्या बाजूला बसच्या शेजारी एक फूट जागा होती. त्यानंतर थेट एक हजार फूट खोल दरी होती. पुढचा रस्ता मोकळा होता. मात्र, एक-दोन फूट अंतराने बस चालवणे, हे अत्यंत जोखमीचे होते. थोडा जरी अंदाज चुकला तरी बस दरीत कोसळण्याची शक्यता होती.
‘‘आपण फार अवघड परिस्थितीत सापडलो आहोत. मला तर समोर मृत्यूच दिसत आहे. त्यामुळे परमेश्वराची प्रार्थना करणे हेच आपल्या हातात आहे.’’ बसचा चालक व वाहकाने शरणागती पत्करली.
‘‘तुम्ही असं हताश होऊ नका. प्रयत्न करा. यश मिळेल.’’ एका प्रवाशाने धीर दिला.
‘‘अशा रस्त्यावर जगातला कोणताही ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही. अहो मागं सरकायला जागा नाही. डाव्या बाजूने दोन फूट गाडी सरकली तरी थेट दरीत कोसळणार. उजव्या बाजूला एक-दोन फुटांवर भला मोठा कडा आहे. त्यामुळे तुम्ही सगळे खाली उतरा आणि वाट मिळेल तसं चालत राहा. या भागात हिंस्र प्राणी आहेत. तेवढं त्यांच्यापासून सावध राहा.’’ चालकाने ही माहिती दिल्यावर प्रवाशांना घाम फुटला. त्यामुळे आता दरीत कोसळून मरायचे की हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मरायचे, एवढाच पर्याय त्यांच्यासमोर होता. तेवढ्यात दोनजण पुढे आले.
‘‘ही गाडी मी सुरक्षितरीत्या बाहेर काढू शकतो. फक्त दिलीपने कंडक्टर म्हणून काम करावे.’’ अनिलने म्हटले. बसमधील सगळ्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला. मग अनिलने बसचे स्टेअरिंग हातात घेतले व दिलीपने हातातील चिमटा वाजवत कंडक्टरची भूमिका स्वीकारली.
‘‘येऊ दे. येऊ दे. थोडी मागं येऊ दे.’’ दिलीपने सांगितले.
‘‘ए म्हातारे खिडकीतून डोकावून कशाला बघतेस? मरायचंय का? तसं असेल तर थोडी कळ काढ. ’’ दिलीप एका आजीबाईंवर खेकसला.
‘‘ए खाली बस की. कशाला उगाच पोरीवर शायनिंग मारतोस. शेवटची घटका आली तरी लाईन मारायचं सोडू नकोस.’’ एका तरुणावर दिलीप ओरडला.
‘‘ केळी खाल्यानंतर साली गाडीतच टाकताय. बस काय तुमच्या तीर्थरूपांनी विकत घेतलीय काय? उचला त्या साली.’’ एका मध्यमवयीन गृहस्थावर दिलीप खेकसला. बसमधील बहुतेक सगळ्या प्रवाशांचा अपमान करून झाल्यावरच, तो निवांत झाला.
अनिलने दिलीपच्या मदतीने बस दरड कोसळल्याच्या भागातून बरोबर बाहेर काढली. पाच किलोमीटर पुढे आल्यावर रस्ता व्यवस्थित होता. सगळ्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एका हॉटेलवर बस थांबल्यावर प्रवाशांच्यावतीने दिलीप व अनिलचा सत्कार करण्यात आला.
‘‘साहेब, तुम्ही आम्हाला जीवदान दिले पण एवढ्या बिकट परिस्थितीतून आणि अरुंद रस्त्यातून तुम्ही बस कशी काय चालवली?’’ एका प्रवाशाने उत्सुकतेने विचारले. त्यावर अनिल म्हणाला, ‘‘अहो त्यात विशेष असं काही नाही. आमच्या रोजच्या सरावाचाच तो भाग आहे. आम्ही दोघंही पुण्यात पीएमटीत नोकरीला आहोत. मी तर बोहरी आळी, शिवाजी रस्ता, लक्ष्मीरस्ता, दारूवालापूल या अत्यंत वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यावरून रोज पीएमटी बस चालवतो आणि हा दिलीप पीएमपीत कंडक्टर आहे. एकाचवेळी प्रवाशांवर खेकसणे व मला सूचना देणे हे दोन्ही कामं तो लीलया करतो.’’ अनिलचं बोलणं ऐकून, सर्व प्रवाशांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.