
पुण्येश्वरचाही प्रश्न आम्ही सोडवणार ः एकनाथ शिंदे
पुणे, ता. २४ ः गणेशोत्सवात गणेश मंडळांवरील निर्बंध पूर्णपणे काढून मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेणार आहे. येणारे सर्व सण उत्साहात व जल्लोषात साजरे होतील. जसा प्रतापगडाचा प्रश्न सोडवला तसा पुण्येश्वरचाही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. कसब्यातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचा उमेदवार विधानसभेत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या समारोपाच्या भाषणात केले.
रासने यांच्या प्रचारार्थ शिंदे यांनी समता भूमी ते लाल महाल असा रोड शो केला. त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपती समोर झालेल्या सभेत ते बोलत होते. उमेदवार रासने, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेतील नेते प्रवीण दरेकर, आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय भोसले, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहरप्रमुख नाना भानगिरे, शैलेश टिळक, किरण साळी आदी उपस्थित होते.
शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करत ‘‘विरोधी उमेदवाराने खूप कामे केली, असे सांगितले जात आहे. मात्र धंगेकर यांनी त्रास दिल्याच्याही पंचवीस तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आपला उमेदवार रासने हा गरीब माणूस आहे,’’ असे सांगितले.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन खऱ्या अर्थाने राज्यात युतीचे सरकार स्थापन केले आहे. धनुष्यबाण चोरला असे म्हणणाऱ्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीकडे तो गहाण ठेवला होता. आम्ही तो सोडवला आहे. मुक्ता टिळक यांनी माझ्याकडे कसब्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न मांडला होता. धोकादायक वाडे, इमारती आहेत, या सर्वांचा पुनर्विकास थांबला आहे. या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करायचा असले तर टीपी स्कीम लागू केली पाहिजे. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणे हे आमची जबाबदारी आहे. तालमींना मदत केली जाईल, मेट्रो, रिंगरोड, विमानतळाचे, वाहतूक कोंडी फोडण्याचे काम आम्ही तातडीने करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत आपलाच विजय आहे. पुढचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत, गाफील राहू नका, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
PNE23T26786