
मतदानापूर्वी आरोपांची धुळवड धंगेकर यांचे उपोषण; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
पुणे, ता. २५ : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेस, महाविकास आघाडीने भाजपकडून पोलिस बंदोबस्तात पैसेवाटप होत असल्याचा आरोप करत ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर उषोषण सुरू केले. भाजपने त्यास प्रत्युत्तर देत धंगेकर यांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने ते आता गोंधळ घालून स्टंट करत असल्याचा आरोप केला. त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे पदाधिकारी, नेते पोलिस बंदोबस्तात मतदारसंघातील वस्त्यांमध्ये पैसे वाटप करत आहेत, त्याविरोधात शनिवारी सकाळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला. त्यानुसार सकाळी कार्यकर्त्यांसह धंगेकर यांनी कसबा गणपती मंदिरापुढे उपोषण सुरू केले. त्यावेळी पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते. भाजपने पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप सुरू केले, कार्यकर्त्यांना प्रचार करण्यापासून रोखून धमकावले जात आहे. शिवाय आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मंत्र्यांनी प्रचार केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. दुपारी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रकार घडणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
धंगेकर यांचे हे आंदोलन सुरू असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावत धंगेकर यांनी हा राजकीय स्टंट केल्याची टीका केली. प्रचार संपलेला असताना धंगेकर यांनी गर्दी जमवून आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी भाजपने केली. तसेच जिजामाता शाळा, तांबट आळी, लोणार आळी, दारूवाला पोलिस चौकी, गुजराती शाळा येथील येथील मतदान केंद्रांवर बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. तेथे जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्याकडे निवेदन देऊन केली.
निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘‘धंगेकर यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्या मानसिकतेतून बेछूट आरोप करत आहेत. हा मतदारांचाही अपमान आहे. तसेच प्रचार शांततेच पार पडलेला असताना पोलिसांवर व प्रशासनावर आरोप करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करत आहेत. जमावबंदीचा आदेश मोडून पुरावे न देता आंदोलन करून केवळ स्टंट केला आहे. त्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा.’’