कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मतदानयंत्रे, कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मतदानयंत्रे, कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना

पुणे, ता. २५ : कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी येत्या रविवारी (ता. २६) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्‍यक मतदान यंत्रांसह सर्व कर्मचारी शनिवारी (ता. २५) दुपारीच मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. पीएमपीएमएलच्या ४३ बस, सात मिनीबस आणि दहा जीपद्वारे मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह शनिवारी आपापल्या मतदान केंद्रांवर मुक्कामी रवाना करण्यात आल्याचे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पीएमपीएमएलच्या १०२ बस, ८ मिनीबस आणि १२ जीपद्वारे सर्व मतदान कर्मचारी हे शनिवारी दुपारी मतदान केंद्रांवर मुक्कामी रवाना झाल्याचे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. या दोन्ही पोटनिवडणुकीच्या मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असून, त्यानुसार पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत सोळा तर, चिंचवड पोटनिवडणुकीत २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका मतदान यंत्रावर कमाल सोळा उमेदवारांची नावे देण्याची तरतूद आहे. शिवाय नकारात्मक मतदानाचा ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी दोन मतदानयंत्रे वापरली जाणार आहेत.

मतदारसंघनिहाय मतदार व कार्यरत यंत्रणा
कसबा विधानसभा मतदारसंघ
- एकूण मतदार - २ लाख ७५ हजार ६७९
- पुरुष मतदार - १ लाख ३६ हजार ९८४
- महिला मतदार - १ लाख ३८ हजार ६९०
- तृतीयपंथी मतदार - ५
- एकूण मतदान केंद्र - २७०
- मतदानासाठी नियुक्त कर्मचारी - १ हजार २५०
- मतदानासाठी राखीव पथके - २७
- पोलिस बंदोबस्त - ८३ अधिकारी व ६०० कर्मचारी तैनात

चिंचवड विधानसभा मतदारसंघ
- एकूण मतदार - ५ लाख ६८ हजार ९५४
- पुरुष मतदार - ३ लाख २ हजार ९४६
- महिला मतदार - २ लाख ६५ हजार ९४७
- दिव्यांग मतदार - ६ हजार ६७०
- तृतीयपंथी मतदार - ३४
- एकूण मतदान केंद्र - ५१०
- मतदानासाठी नियुक्त कर्मचारी - तीन हजार
- मतदानासाठी राखीव पथके - ५१
- पोलिस बंदोबस्त - ७२५ अधिकारी व ३ हजार ७०७ कर्मचारी तैनात

मतदानासाठी यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा अनिवार्य
- मतदार ओळखपत्र
- आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बॅंक किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक
- श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
- वाहनचालक परवाना, पॅनकार्ड
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्टकार्ड
- भारतीय पारपत्र (पासपोर्ट)
- छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज
- राज्य, केंद्र सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र
- खासदार, आमदारांना दिलेले त्यांचे अधिकृत ओळखपत्र
- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे दिव्यांगत्वाचे ओळखपत्र

परदेशातील मतदारांसाठी
मूळ भारतीय पासपोर्ट अनिवार्य
कसबा किंवा चिंचवड या दोन्हीपैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील मतदार हे परदेशात राहत असतील तर, त्यांना त्यांची
ओळख पटवून देण्यासाठी मूळ भारतीय पासपोर्ट सादर करावा लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com