आठवणीतले कुसुमाग्रज- वात्सल्यमूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवणीतले कुसुमाग्रज- वात्सल्यमूर्ती
आठवणीतले कुसुमाग्रज- वात्सल्यमूर्ती

आठवणीतले कुसुमाग्रज- वात्सल्यमूर्ती

sakal_logo
By

मराठी काव्य समृद्ध करणारे कवी, समर्थ नाटककार, जीवननिष्ठांची जपणूक करणारे पुरोगामी विचारवंत, वात्सल्यमूर्ती वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. त्यांच्या नावाभोवती मराठी मनाची गुंफण झालेली असल्याने कुसुमाग्रज नाव उच्चारताच विनम्र भावाने आपण सारे नतमस्तक होतो. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जयंतीदिन. त्यानिमित्ताने...
- डॉ. अरविंद नेरकर,
संतसाहित्याचे अभ्यासक

कुसुमाग्रज म्हणजे नव्या-जुन्या लेखकांचे श्रद्धास्थान. १९३२ मध्ये त्यांनी रत्नाकर मासिकात लेखन करायला सुरवात केली. पुण्याच्या विविध दैनिकांत त्यांनी १९४२ पर्यंत काम केले. याचवर्षी त्यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यांनी अनेक नाटके लिहिली. पैकी ‘नटसम्राट’ नाटकाने वि. वा. शिरवाडकर घराघरांत पोहोचले. कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. पुणे विद्यापीठाने त्यांना १९८६ मध्ये डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले तर १९८८ रोजी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविले. कुसुमाग्रज या वात्सल्यमूर्तीचा मी शालेय विद्यार्थी असल्यापासून संपर्क आला. हा संपर्क नासिकला २७ फेब्रुवारी १९९९ ला झालेल्या अखेरच्या भेटीपर्यंत कायम राहिला. सुमारे २५ ते ३० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात तात्यासाहेबांच्या भेटीचे सुवर्णक्षण माझ्या आठवणींच्या कोंदणात मी मनापासून जपून ठेवले आहेत.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याला एक वर्ष राहून वृत्तपत्रविद्या पदवी शिक्षण घेण्यास वडिलांचा विरोध होता. पण, तात्यासाहेबांकडे गेल्यावर आणि माझ्या इच्छेला तात्यांच्या संमतीमुळे वडिलांनी होकार दिला. माझ्या वडिलांचा वाढदिवस हा तात्यांच्या वाढदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला असे. तात्या हे वडिलांचेही श्रद्धास्थान होते. त्यामुळे तात्यांना भेटायला मी वडिलांबरोबर जात असे.
आणीबाणी संपल्यावर मी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून वर्षभर कार्यरत होतो. त्यानंतर जुलै १९७७ मध्ये माझी राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी पदावर वयाच्या नियुक्ती झाली. सुरवातीला औरंगाबाद येथे दीड वर्षे काम केल्यावर नाशिक विभागासाठी माझी बदली झाली. नाशिक विभागात वसंत व्याख्यानमाला, लोकहितवादी मंडळ यांसारख्या सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांतून पदाधिकारी म्हणून कामाची संधी मला मिळाली. या संस्थांना तात्यासाहेब मार्गदर्शन करीत असत.
१९७९-१९८३ पर्यंत नाशिक विभागासाठी काम केल्यानंतर १९८३ ते १९८६ या काळात मी औरंगाबाद येथे बदली होऊन पुन्हा आलो. १९८६ मध्ये माझी पुण्याला बदली झाली. पुणे विद्यापीठात एम.ए. मराठी (बहि: स्थ विद्यार्थी) साठी नोंदणी केली आणि दोन वर्षांनी एम.ए. मराठी पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. दरम्यान, पायी वारी आळंदी ते पंढरपूर अशी करतानाच वारीविषयक संशोधनाचा निश्चय केला होता. काही महिन्यांतच ‘पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य’ या माझ्या विषयाला नोंदणी मान्य झाली. नाशिकला आल्यावर तात्यासाहेबांना भेटून प्रबंधाची प्रगती सांगितली. वर्षभरात प्रबंधाच्या प्रक्रियेतून सर्व सोपस्कार पूर्ण होऊन डॉ. श्री. रं. कुलकर्णी (हैदराबाद), डॉ. यू. म. पठाण (औरंगाबाद) यांच्या अभिप्रायानंतर तोंडी मुलाखत होऊन मला डॉक्टरेट पदवी मिळाली. तात्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले.
तात्यासाहेबांची शेवटची भेट २७ फेब्रुवारी १९९९ रोजी झाली. २७ फेब्रुवारी हा तात्यांचा वाढदिवस! तात्यांच्या भेटीसाठी मी आणि माझे वडील पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या निवासस्थानी आलो. आतल्या खोलीत तात्या बिछान्यावर झोपले होते. मी म्हणालो, ‘‘तात्या आता बरं वाटतंय ना.’’ तात्यांनी काही न बोलता वरती हात केला. ‘तात्यासाहेबांना पूर्ण लवकर बरे वाटू दे’, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करू लागलो. १० दिवसांनी १० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रजांच्या जीवन प्रवासाची सांगता झाली. मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा हा ज्ञानमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला.