
हायप्रोफाईल भागात घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
पुणे, ता. २५ : आलिशान मोटारीतून येऊन हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक कोटी २१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये औंध भागातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून चोरीस गेलेल्या पिस्तुलाचाही समावेश आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार आणि नारायण शिरगांवकर या वेळी उपस्थित होते.
पोलिसांनी या गुन्ह्यात चारजणांना अटक केली आहे. टोळीप्रमुख महम्मद इरफान ऊर्फ उजाला ऊर्फ रॉबिन हुड (रा. जोगिया, जि. सीतामढी, बिहार) याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा आणि तमिळनाडूमध्ये २७ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील शमीम शेख (मूळ रा. बिहार), अब्रार शेख आणि राजू म्हात्रे (दोघे रा. धारावी, मुंबई) यांना अटक केली आहे. तर, सुनील यादव, पुनीत यादव आणि राजेश यादव (तिघे रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) हे तमिळनाडू पोलिसांच्या कोठडीत आहेत.
सिंध सोसायटीमधील बांधकाम व्यावसायिक जगदीश कदम यांच्या घरातून परदेशी बनावटीचे पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे, तीन घड्याळे, चार तोळ्याची सोनसाखळी आणि दोन लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या गुन्ह्याचा जलद तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने तपास पथके नेमली होती.
बनावट नंबर प्लेट लावून घरफोडी
तपासादरम्यान, आरोपींनी आलिशान मोटारीला बनावट नंबर प्लेट लावून घरफोडी केल्याचे समोर आले. पोलिसांनी पुणे-नाशिक मार्गावरील २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका टोल नाक्यावरून मोटारीचा मूळ क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यात रॉबिन हुड आणि साथीदारांनी सिंध सोसायटीमध्ये घरफोडी केल्याचे समोर आले. गुन्हे शाखेची दोन पथके गाजियाबादला रवाना केली. परंतु, मुख्य सूत्रधार रॉबिन हुड हा विविध राज्यांत राहण्याचे ठिकाण बदलत होता. सलग आठ दिवस आरोपींचा माग काढत पोलिस पंजाबमधील जालंधरला पोचले. तेथे पोलिसांनी बिगारी कामगारांचा वेश परिधान करून रॉबिन हुड याला अटक केली. आलिशान मोटार ही धनपाल सिंग याची असून, त्याच्याविरुद्ध दिल्लीत गॅंगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे. रॉबिन हुड हा चोरलेली घड्याळे मुंबईतील मित्र शमीम शेख याला विक्रीसाठी देत होता. त्याच्याकडून सिंध सोसायटीमधून चोरीस गेलेली तीन आणि विशाखापट्टणम येथील घरफोडीमधील सात घड्याळे जप्त केली.
गुगल सर्च करून घरफोड्या
आरोपी हा एखाद्या शहरात गेल्यानंतर गुगल सर्च करून हायप्रोफाइल सोसायट्यांची माहिती मिळवत असत. मग आलिशान मोटारीतून घरफोड्या करीत होते. आरोपी रॉबिन हुड याने घरफोड्या करून मिळालेल्या पैशांतून सामाजिक कार्य करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.