
गाऱ्हाणे निवारण मंचासाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्ती
पुणे, ता. २५ ः पुणे शहरातील विद्युत ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचामध्ये महावितरणने भरावयाचे कार्यकारी अभियंता (मंचचे पदसिद्ध सचिव सदस्य), एक स्टेनो टायपिस्ट व शिपाई कर्मचारी अशी तीन पदे मंजूर असून, यापैकी दोन पदे ही संबंधित पदावरील व्यक्ती सेवानिवृत्त झाल्याने आणि एका कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्याने रिक्त झाली होती. परंतु आता यापैकी दोन जागांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी शनिवारी सांगितले.
महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचात पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा अभाव, अडचणी सोडविणारा मंचच अडचणीत’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तावर महावितरणने हे स्पष्टीकरण दिले आहे. पुणे येथील ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचमधील महावितरणच्या नियमित शिपाई कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाले आहे. याशिवाय स्टेनो टायपिस्ट व कार्यकारी अभियंता या पदावरील व्यक्ती नोव्हेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाल्या आहेत. मात्र, या दोन्ही रिक्त जागा महावितरणकडून ताबडतोब भरण्यात आलेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.