
पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून कोंढव्यातील घटना; दांपत्यावर गुन्हा दाखल
पुणे, ता. २६ : प्रेयसी संसारात हस्तक्षेप करते म्हणून प्रियकराने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना कोंढव्यातील शिवनेरीनगरमध्ये घडली. प्रेयसीचा गळा दाबून खून केल्यानंतर प्रियकराने तिचा मृतदेह घरात लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचला. मात्र वैद्यकीय अहवालात प्रेयसीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
दांपत्याचा बनाव उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फातिमाबी शेख (वय ३४, रा. कोंढवा खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रईस हनीफ शेख (वय ४०) आणि त्याची पत्नी शबाना (वय ३५, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमाबी आणि रईस यांचे प्रेमसंबंध होते. मात्र फातिमाबी रर्इस याच्या संसारात हस्तक्षेप करत असल्याने त्याने आणि पत्नी शबाना यांनी फातिमाबीचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी (ता. २४) सकाळी सहा ते आठ दरम्यान तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर फातिमाबीचा मृतदेह घरात लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचला. त्यानंतर रईसने फातिमाबीला ससून रुग्णालयात दाखल केले.
चौकशीत दिली खुनाची कबुली
वैद्यकीय तपासणीत फातिमाबीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयावरून रईस आणि शबाना यांची चौकशी केली. चौकशीत दोघांनी फातिमाबीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.