
सकाळी शांतात, संध्याकाळी रांगा!
पुणे, ता. २६ ः कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी शहरात मतदान पार पडले. तरुण वर्गासह ज्येष्ठ मतदारांनीही यामध्ये सहभाग घेत आपला हक्क बजावला. सकाळपासून दुपारर्यंतच्या सत्रात मतदानाचा टक्का कमी होता. हक्काचा मतदार बाहेर पडला नाही, त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत होती. मात्र, जशीजशी मतदानाची वेळ संपत आली तशी मतदान केंद्रापुढे रांगा लागल्या, लोहियानगर, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, दारूवाला पूल, गुरुवार पेठे यासह इतर भागात रांगा लागलेल्या होता.
कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून प्रचाराची राळ उडाली. काँग्रेस, भाजपकडून एकमेकांवर आरोप करून विजयाची दावेदारी केली होती. अखेर रविवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील ७६ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. केंद्रांच्या बाहेर राजकीय पक्षाकडून कार्यकर्त्यांची यंत्रणा लावण्यात आली होती. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यकर्ते नाव शोधून देणे, मतदान केंद्र, खोली क्रमांक कोणती आहे हे सांगण्यासाठी मदत करत होते. सकाळच्या वेळेत मतदारांनी लवकर येऊन मतदान करावे यासाठी प्रयत्न ?असले तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ ८.२५ टक्केच मतदान झाले होते. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांनी फोन
यामध्ये त्यानंतर मतदानाला येण्याचे प्रमाण वाढले. साधारणपणे मतदानासाठी २० मिनिटांपासून ते दीड तासापर्यंत वेळ लागत होता. काही ठिकाणी मतदान यंत्र गतीने काम करत नसल्यानेही रांगा लागलेल्या होत्या.
मतदान केंद्रावर प्रशासनाचे कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना मदत करत होते. ज्यांना जास्त चालणे, पायऱ्या चढणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी प्रत्येक केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली होती.
मतदारसंघाच्या पश्चिम भागात म्हणजे सदाशिव पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, दत्तवाडी या भागात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदार येत होते. पण पूर्व भागातील म्हणजे लोहियानगर, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, दारूवाला पूल, गुरुवार पेठे येथे सकाळच्या वेळेत मतदान कमी झाले, तर दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले.
कार, ॲटोची सुविधा
घरापासून मतदान केंद्र लांब असल्याने किंवा मतदार सिंहगड रस्ता, कोथरूड, कोंढवा, कौसरबाग स्थलांतरित झाले आहेत, अशांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी राजकीय पक्षांना कार, ॲटोची व्यवस्था करण्यात आली होती. चुरशीच्या निवडणुकीमुळे हे स्थलांतरित उमेदवार मतदान केंद्रापर्यंत आणण्यामध्ये बऱ्यापैकी यश आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
मतदानाची वैशिष्ट्ये
- बूथवरील कार्यकर्ता बूथ सोडून जाऊ नये यासाठी नाश्ता, चहा, जेवण याची व्यवस्था.
- पोलिसांकडूनही वृद्ध व इतर मतदारांना मदत
- पैसै वाटपाच्या आरोपांमुळे पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि पेट्रोलिंग सुरू होते
- मतदान केंद्रातील मशिन स्लो चालत असल्याच्या तक्रारी
- मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यावसायिकांकडून ऑफर
- मतदार याद्यांमधील घोळ पोटनिवडणुकीतही कायम
- ८० वर्षावरील मतदारांसाठी पोस्टल मतदानाची सोय होती, पण ती न मिळाल्याने अनेकजण केंद्रावर यावे लागले.