दिवस मावळताना पूर्व भागातील मतदानाला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवस मावळताना पूर्व भागातील मतदानाला वेग
दिवस मावळताना पूर्व भागातील मतदानाला वेग

दिवस मावळताना पूर्व भागातील मतदानाला वेग

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी चांगला उत्साह दाखविल्याचे समाधानकारक चित्र रविवारी दिसून आले. सकाळपासून काही प्रमाणात संथगतीने सुरू असणाऱ्या मतदानाला दुपारनंतर चांगलीच गती आली. दुपारनंतर पूर्व भागात मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र होते.

दाट लोकवस्ती, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे कार्यकर्त्यांचे असलेले मोठे जाळे आणि दांडगा जनसंपर्क या वेगवेगळ्या कारणांमुळे कसबा पोटनिवडणुकीत पूर्व भागामध्ये मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. पूर्व भागामध्येही रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून तुरळक प्रमाणातच मतदार मतदान केंद्रांकडे फिरकले. सकाळी दहा वाजल्यानंतर पूर्व भागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ या भागामध्ये मतदारांना घराबाहेर काढण्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यश येऊ लागले. दुपारच्या जेवणानंतर मतदारदेखील हळूहळू घराबाहेर पडू लागले. विशेषतः दुपारी तीन ते चार वाजल्यानंतर मतदार केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढू लागली. त्यावेळी तेथे राजकीय पक्षांच्या बूथवरील कार्यकर्त्यांकडून त्यांना तत्काळ मतदार स्लीप देण्यात येत होत्या. दुपारी चार वाजल्यानंतर कसबा पेठ, गणेश पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, लोहियानगर, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ परिसर या परिसरामधील मतदान केंद्रांवर नागरिकांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये तरुण-तरुणींसमवेतच ज्येष्ठ, महिला मतदारांची संख्या जास्त होती. काही मतदारांनी तर आपापली वाहने वेगात पळवीत मतदान केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला.

मतदानाची स्थिती
राउंड वेळ झालेले मतदान (टक्क्यांत)
१ ला सकाळी ७ ते ९ ६.५
२ रा सकाळी ९ ते ११ ८.२५
३ रा सकाळी ११ दुपारी १ १८.५
४ था दुपारी १ ते ३ ३०.५
५ वा दुपारी ३ ते सायंकाळी ५ ४५.२५
६ वा सायंकाळी ५ ते ६

कसब्यात मागील तीन निवडणुकांमध्ये झालेले मतदान
वर्ष टक्के
२००९ ४९.०७
२०१४ ६१.५७
२०१९ ५१.६२