तीन हजार किलो प्लॅस्टिक बाटल्या जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन हजार किलो प्लॅस्टिक बाटल्या जमा
तीन हजार किलो प्लॅस्टिक बाटल्या जमा

तीन हजार किलो प्लॅस्टिक बाटल्या जमा

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः महापालिकेने प्लॅस्टिकचा कचरा निर्मुलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लॅस्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन हजार २४८ किलो प्लॅस्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. दरम्यान, स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे.
शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लॅस्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एक फेब्रुवारी रोजी ‘प्लॅस्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची घोषणा केली होती. कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रीक बाईक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. स्पर्धकांनी आपल्या घरातील, कामाच्या ठिकाणातील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या प्लॅस्टिक बाटल्या संकलित करून त्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जमा करायच्या होत्या. ही स्पर्धा २८ फेब्रुवारीपर्यंत होती, मात्र नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे.

प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर
महानगरपालिकेने अधिकृत केलेल्या रिसायक्‍लर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्‍स, इंटरलॉकिंग ब्लॉक्‍स इ. साहित्य बनवून त्याचा वापर शहर सौंदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथच्या सुशोभीकरणासाठी करणार आहेत.

प्लॅस्टिकच्या कचऱ्याबाबत जनजागृती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार, प्लॅस्टिक बाटल्या संकलन स्पर्धेसाठी नागरिकांनीही चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ३ हजार २४८ किलो प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन झाले आहे.
- आशा राऊत,
घनकचरा विभाग प्रमुख, महापालिका

स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रीक बाईक
- विजेत्यांना बक्षीस

क्षेत्रीय कार्यालये व प्लॅस्टिक कचरा (किलोमध्ये)
हडपसर-मुंढवा - ६८९
वारजे-कर्वेनगर - ३६०
धनकवडी-सहकारनगर - ३१२
नगररस्ता-वडगाव शेरी - २९४
कोथरूड-बावधन - २८६
कसबा-विश्रामबाग - २३९
येरवडा-कळस-धानोरी - २२०
शिवाजी रस्ता-घोले रस्ता - १८६
बिबवेवाडी- ११७
औंध-बाणेर - १०३
कोंढवा-येवलेवाडी - १०३
वानवडी-रामटेकडी - १०२
भवानी पेठ - ८२
ढोले पाटील रस्ता - ४१
सिंहगड रस्ता - ४७