आता उत्कंठा निकालाची

आता उत्कंठा निकालाची

पुणे, ता. २६ : कॉंग्रेस महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५०.४७ टक्के मतदान झाले. राज्यात मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या तुलनेत पुण्याच्या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मार्च रोजी होणार असून त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्यात, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही मतदार संघासाठी निवडणूका जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच उमेदवारीपासून ही निवडणूक चर्चेत आली होती. उमेदवारी स्पष्ट झाल्यानंतर दोन आठवड्यांत राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडविण्यास सुरवात झाली. आज अखेर (रविवारी) त्यांचे रूपांतर मतदानात झाले. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. तर महाविकास आघाडीचा आत्मविश्‍वास वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर या निवडणूका जाहीर झाल्यापासून दोन्ही राजकीय पक्षांनी या प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे शहर पातळीवरील नेत्यांऐवजी ही निवडणुकीत सुरवातीपासून केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी लक्ष घातले.


रंगीत तालीम म्हणून लक्ष
महापालिका आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे राज्याबरोबरच केंद्रांचे लक्ष लागले होते. परिणामी, मतदारसंघाच्या विकासावर चर्चा होण्याऐवजी कॉंग्रेस आणि मोदी यांच्या कारर्किदीतील कारभाराची तुलना, शिवसेनेची फूट, शिंदे-फडणीस सरकारचा कारभार आणि अखेरच्या टप्प्यात हिंदुत्व या मुद्यांवर येऊन थांबली. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला होता. हक्काच्या पट्ट्यात मतदान झाले, तर विजय सहज मिळू शकतो, हे शेवटच्या आठवड्यात लक्षात आल्याने दोन्ही पक्षांनी त्या दृष्टीने यंत्रणा राबविली.

वाढलेला टक्का कोणाचा?
वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार?, यावर राजकीय विश्‍लेषक सायंकाळपासूनच कामाला लागले. कसब्यातील गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जेमतेम ५० टक्के राहिली. २०१४ ला मोदी लाटेत या मतदारसंघात ६१.५७ टक्के मतदान झाले होते. तर १९९१ मध्ये भाजपचे आमदार अण्णा जोशी यांनी राजीनामा देऊन ते लोकसभेवर गेल्यामुळे रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत ५१ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी कॉंग्रेसने बाजी मारली होती. यंदाही महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी सरळ लढत झाल्याने मतदानाच्या टक्केवारीने पन्नासचा टक्का ओलांडला.


तीन सार्वत्रिक निवडणुकीत कसब्यातील मतदानाची टक्केवारी
२००९ ---- ४९.०७ टक्के
२०१४-----६१.५७ टक्के
२०१९ --- ५१.६२ टक्के

चिंचवड मतदार संघातील आकडेवारी
२०१४--- ५६. ९३ टक्के
२०१९ ---- ५३. ६९ टक्के
२०२३ (पोटनिवडणूक)----५०.४७

कसबा पोटनिवडणुकीतील टक्केवारी
१९९१---- ५१ टक्के
२०२३ (पोटनिवडणूक) --- ५०.०६ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com