आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते
आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते

आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते

sakal_logo
By

आंबेडकरी चळवळीतील दोन ज्येष्ठ अभ्यासू नेते, माजी आमदार जयदेव गायकवाड आणि कास्ट्राईब संघटनेचे माजी सरचिटणीस विजय जाधव यांचा सत्कार बुधवारी (ता. १) होत आहे, त्यानिमित्त...
- अरुण खोरे

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत अभ्यासू नेते आणि कार्यकर्त्यांची परंपरा खूप मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. यंदा दलित पॅंथर संघटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पॅंथरच्या स्थापनेपासून या सगळ्या प्रक्रियेत सहभागी असलेले अर्जुन डांगळे, ज. वि. पवार यांच्यासारख्या अभ्यासू नेत्यांचे ग्रंथलेखन प्रसिद्ध झाले आहे. जयदेव गायकवाड हे संसदीय राजकारणात सक्रिय आहेत, ते स्वतः ग्रंथ लेखक आहेत. नामदेव ढसाळ यांच्याबरोबर दलित पॅंथरच्या आरंभीच्या संघर्षात ते सक्रिय होते. त्यानंतर ते सम्यक आंदोलनाकडे वळाले आणि नंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या वाटचालीत १८-२० वर्षे ते काम करत होते. गायकवाड यांनी या सगळ्या काळात दलित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा नेटाने प्रयत्न केला. याच काळात त्यांचे वर्गमित्र असलेले विजय जाधव हे कास्ट्राइब या संघटनेचे एक संस्थापक सदस्य आणि राज्य स्तरावरील सरचिटणीस म्हणून काम करणारे असे अभ्यासू नेते सहभागी झाले. 
समाज कल्याण खात्याने १९८८ मध्ये अडीच-तीन वर्षे काम केल्यानंतर २४७ कर्मचाऱ्यांना कमी केले. त्या संदर्भात कास्ट्राइबच्या माध्यमातून जाधव यांनी आंदोलन उभे केले. या सगळ्या लोकांना परत कामावर घेणे सरकारला भाग पाडले. याखेरीज सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षणातून पदोन्नती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग दिली जाते, त्याकडे लक्ष वेधले. शिंदे यांनी त्याला सुयोग्य प्रतिसाद दिला.
सामाजिक प्रश्नांवर आणि लढ्यात दलित पॅंथरबरोबर डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखालील युवक क्रांती दल, तरुण नेते उल्हास पवार यांच्या नेतृत्वाखालील युवक काँग्रेस या संघटना जवळपास सारखी भूमिका घेऊन काम करत होत्या. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, विनायकराव कुलकर्णी, डॉ. बाबा आढाव यांचे मार्गदर्शन या सर्वांना मिळत होते. दलित साहित्यासंबंधी टीका केल्यामुळे १९७७ मध्ये पुण्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत गोंधळ केला. त्यावेळी पु. ल. देशपांडे यांनी गायकवाड यांना बोलण्याची संधी दिली.
इनामी वतन जमिनीच्या संदर्भात गायकवाड यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. याखेरीज या दोन्ही नेत्यांनी नामांतर आंदोलनात सहभाग घेतला. कायद्याचा आधार घेत सामाजिक न्यायाच्या दिशेने जायचे, ही भूमिका जयदेव आणि विजय या दोघांनी नेहमीच घेतली. जयदेव आणि विजय या दोघांनाही संसदीय राजकारणातूनच पुढे जाण्याची गरज आहे, असे वाटते. जयदेव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख म्हणून काम करतात. गायकवाड हे राज्यघटना आज राष्ट्रग्रंथ हे अभियान चालवत आहेत. त्याबाबत जाधव आणि त्यांचे सहकारी हे एकत्रित काम करताना दिसतात. अगदी अलीकडेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर’, या संस्थेची सुरुवात करून नव्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या सत्कार समारंभात दलित पॅंथरच्या दीर्घ वाटचालीत असलेले काही ज्येष्ठ कार्यकर्ते आपले अनुभव मांडणार आहेत.