
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन
पुणे, ता. २७ ः राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मागील आठवडाभरापासून बेमुदत संपावर जाऊनही त्यांच्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. यामुळे मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या मंगळवारपासून (ता. २८) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या राज्य अध्यक्षा शुभा शमिम यांनी सोमवारी (ता. २७) सांगितले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी सर्व अंगणवाडी कर्मचारी मागील आठवडाभरापासून बेमुदत संपावर गेले आहेत. संप सुरु झाल्यापासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी आपापल्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा, निदर्शने आणि धरणे आंदोलन करत आहेत. तरीही राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागले आहे. यामुळे सर्व कर्मचारी संतप्त झाले असल्याने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शमीम यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी हे गेल्या सोमवारपासून (ता.२०) बेमुदत संपावर गेले आहेत. दरम्यान, अंगणवाडीसेविका आणि कर्मचारी हे पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण आदी सेवा गाव पातळीवर देत असतात. मानवी विकास निर्देशांकामध्ये आपला देश रसातळाला गेलेला असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक आणि परिणामकारक कामामुळे देशाचे स्थान थोडे वर आले. तरीसुद्धा इतक्या मूलभूत विषयाबद्दल केंद्र आणि राज्य सरकार बेफिकीर आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडे या दोन्ही सरकारांचे हवे तेवढे लक्ष नसल्याने, या विभागासाठीची तरतूद सातत्याने कमी केली जात असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले.
मानधन नको, वेतन हवे, तूर्त मानधनात भरीव वाढ मिळालीच पाहिजे, अंगणवाडीसेविका मदतनिसांना, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, पोषण ट्रॅकर मराठीतून उपलब्ध करून द्या, दर्जेदार नवीन मोबाईल किंवा टॅब देण्यात यावा, सेवासमाप्ती लाभ, ग्रॅज्युइटी, मासिक पेन्शन देण्यात यावे, इंधनाचे दर व भाड्यात वाढ करा आदी मागण्यांसाठी हे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत.