
लहान मुले सर्दी-खोकल्याने बेजार
पुणे, ता. २७ : ‘‘सकाळी साडेसहा वाजता शाळेत जाताना अक्षरशः स्वेटर घालावा इतकी थंडी असते. तर, दुपारी येताना उन्हाचा चटका जाणवतो. अशा वातावरणामुळे इयत्ता पहिलीमध्ये असणारा शौनक वारंवार आजारी पडत आहे,’’ सनदी लेखापाल राधिका सरदेशपांडे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘‘सकाळी सात वाजता शाळा असते. साडेसहा वाजता व्हॅन येते. तोपर्यंत हवेत गारठा असतो. त्यामुळे स्वेटर घालण्याशिवाय पर्याय राहात नाही. दुपारी साडेबारा वाजता उन्हाचा चटका वाढलेला असतो. सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका यामुळे मुलं आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, ताप तर दर १०-१५ दिवसाला परत-परत येतो.’’
हे एका शौनकच्या आईचा रोजचा अनुभव नाही, तर आपल्यापैकी सकाळी लवकर कार्यालयात जाणारे, शाळा-महाविद्यालयाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला असाच अनुभव येत आहे. या ऋतू बदलाच्या काळात लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ नोंदवितात.
औषधे बदलून देण्यावर भर
सर्दी-खोकला झाल्यानंतर चार-पाच दिवसांमध्ये बरा होत नाही. तर, तो १०-१५ दिवस रेंगाळतो. त्यात ताप येतो. डोके दुखी, अंग दुखीदेखिल असते. त्यामुळे परीक्षेच्या दिवसांमध्ये मुले आजारी पडत असल्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाणाऱ्या पालकांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. यावर एक प्रभावी उपाय म्हणजे, औषधे बदलून देणे, हा असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.
का पडतात मुले आजारी?
१) सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा आहे. हिवाळी संपून उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे पहाटेचा गारठा आणि दुपारचे ऊन असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत.
२) अशा वातावरणात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढतो. असे विषम वातावरण वेगवेगळ्या विषाणूंसाठी पोषक असते. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढतात.
३) लहान मुलांमध्ये बदलत्या वातावरणाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी असते. त्यातून ही मुले आजारी पडतात. साधारणतः १० ते १५ दिवसांमध्ये ही मुले बरा होतात, अशी माहिती डॉ. पंकज जोशी यांनी दिली.
वारंवार मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. एका आजारातून बरे झाल्यानंतर मुलांना लगेच दुसरा आजार होतो. सध्या गोवर आणि कांजण्या यांच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे तापामागचे नेमके कारण काय, या दृष्टीने तपासणी केली जाते. औषधोपचार केल्यानंतर ताप लगेच कमी होत नाही, म्हणून पालकांनी घाबरून जाऊ नये. हा ताप टप्प्या-टप्प्याने कमी होतो. ताप नेमका कशामुळे आला आहे, त्याचे निदान करून त्यावर लवकर उपचार होतील, या दृष्टीने पालकांनी काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. रमेश वैद्य, बालरोगतज्ज्ञ