
पाणीपट्टी वसुलीसाठी कसरत
पुणे, ता. २८ ः पाणी पुरवठा विभागाची थकबाकी ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, पण ती वसूल करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत. शासकीय संस्थांची पैसे न देण्याची मानसिकता, न्यायालयीन प्रकरणे, खराब झालेले मीटर यामुळे ग्राहकांकडून पाणीपट्टी वसूल करण्याचे प्रमाण कमी आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५०६ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी केवळ १०५ कोटी रुपये फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा झाले आहेत.
समान पाणी योजनेची वसुली नाही
पुण्यात सध्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक घराला, सोसायटीला पाण्याचे मीटर बसवले जात आहेत. त्याच्या बिलाची वसुली अद्याप सुरू केलेली नाही. पण शहरात पूर्वी शासकीय व खासगी संस्था, व्यावसायिकांना नळजोड देताना मीटर बसविले होते. ते वारंवार नादुरूस्त होतात. त्याचप्रमाणे शहरात रेल्वे, संरक्षण विभाग, कॅन्टोन्मेंट, शिक्षण संस्था, शासकीय विद्यापीठ यांना महापालिकेतर्फे पाणी पुरवठा केला जातो. पण त्यांच्याकडूनही दरवर्षी पैसे भरले जात नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठ्याची थकबाकी ६१९ कोटी रुपये इतकी झाली आहे.
उद्दिष्टापेक्षा वसुली खूपच कमी
महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाची बाजू भक्कम दाखविण्यासाठी पाणी पट्टी ५०० कोटी रुपये दाखविण्यात येते; पण प्रत्यक्षात त्याच्या २० टक्के रक्कम जमा करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुण्यात ४० हजारांहून अधिक नळजोड आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागाला ५०६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २८ फेब्रुवारीपर्यंत केवळ १०४ कोटी ४८ लाख रुपयेच जमा झाले आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ९१ कोटी ४४ लाख रुपये जमा झाले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा १३.०४ कोटी रुपये उत्पन्न जास्त मिळाले असले तरी उद्दिष्टापेक्षा खूप कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्यवर्षीपेक्षा यंदा १३ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढून १०४ कोटी रुपये जमा झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी एक महिना शिल्लक असल्याने या कालावधीत उत्पन्न वाढेल.
- अनिरुद्ध पावसकर,
प्रमुख, पाणी पुरवठा
२० टक्के थकबाकी
महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून वर्षभर जी पाणीपट्टी वसूल केली जाते, त्यामध्ये ८० टक्के हे नियमीत बिल आहे. तर २० टक्के थकबाकी आहे.
वसूल झालेली पाणीपट्टी
वर्ष - वसूल रक्कम (कोटीमध्ये)
२०१९-२० - ९९.७९
२०२०-२१ - ९७.६६
२०२१-२२ - १०२
२०२२-२३ (फेब्रुवारी) -१०४.४८
काय आहेत अडचणी?
- पाणीपट्टी वसूल करण्याचे प्रमाण कमी
- शासकीय संस्थांची पैसे न देण्याची मानसिकता
- न्यायालयीन प्रकरणे
- खराब झालेले मीटर
- ग्राहकांची चालढकल
पाणी मीटरबाबत अडचणी
- शासकीय व खासगी संस्था, व्यावसायिकांना पूर्वी नळजोड देताना मीटर बसविले
- हे मीटर मेकॅनिकल तंत्रज्ञानाचे असल्याने वारंवार नादुरूस्त
- नादुरूस्त मीटरचे प्रमाण ४३.९० टक्के
- मीटर दुरुस्त न केल्याने सरासरी वापराचे प्रमाण काढून व्यावसायिकांना बिले
- अनेक ग्राहकांना या रकमा जास्त वाटत असल्याने बिल भरण्यास टाळाटाळ
आपले मत मांडा...
पाणीपट्टी वसूल करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. त्यातच वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकजण पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत आपले मत मांडा...