
सोने खरेदीदार आनंदी, चांदी घेणाऱ्यांची चांदी!
पुणे, ता. २८ : लग्न सरार्इत दागिन्यांवर करावा लागणारा खर्च तसेच गुंतवणूक म्हणून सोने-चांदी घेणाऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याचे प्रतिदहा ग्रॅमचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी कमी झाले आहे. तर चांदी घेणाऱ्यांची खऱ्या अर्थाने चांदी होणार आहे. गेल्या ३० दिवसांत चांदी प्रतिकिलो पाच हजार ८०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील केंद्रीय बँकांनी वाढवलेला सोन्याचा साठा आणि गुंतवणुकीचा चांगला पर्याय असल्याने झालेली खरेदी यामुळे ऑगस्ट २०२२ पासून जानेवारी २०२३ दरम्यान सोन्याचे दर सहा हजार रुपयांनी वाढले होते. एक ऑगस्ट २०२२ रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५१ हजार ३५० रुपये होते. एक फेब्रुवारी रोजी हा दर ५७ हजार ६६९ रुपये झाला आहे. तर चांदी देखील तेजीने वाढले होते. याच काळात चांदी प्रतिकिलो ५७ हजार ७४२ वरून ६९ हजार ३६५ रुपयांवर पोचली होती. मात्र आता सोन्या-चांदीचे दर पुन्हा कमी झाले असून आता ते स्थिर राहतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
फेब्रुवारीमधील सोने व चांदीचे दर (रुपयांमध्ये)
तारीख - सोने २४ कॅरेट- सोने २२ कॅरेट - चांदी (प्रतिकिलो)
०१ - ५७,८२३ - ५४,१०१ - ६९,७००
११ - ५७,५७० - ५३,५८० - ६७,४५०
२० - ५६,९४४- ५२,९६७ - ६६,७००
२१ - ५६,७८२- ५२,८४७ - ६६,५००
२२ - ५६,७७२ - ५२,८३७ - ६६,८००
२३ - ५६,५६०- ५२,६४० - ६६,५००
२४ - ५६,३८८- ५२,४८४- ६५,४५०
२५ - ५६,१५६- ५२,२६४- ६४,७००
२७ - ५६,१५६- ५२,२६४- ६४,७००
२८ - ५६,२०५- ५२,१४२- ६३,९००
कमी झालेले दर - १६१८ - १९५९ - ५८००
गेल्या सहा महिन्यांतील दर
तारीख - २४ कॅरेट - २२ कॅरेट - चांदी (एक किलो)
२८-२-२०२३ - ५६,२०५- ५२,१४२- ६३,९००
१-२-२०२३ - ५७,८२३ - ५४,१०१ - ६९,७००
१-१-२०२३ - ५४,८७४ - ५०,४८४ - ६८,११८
१-१२-२०२२ - ५२,९३२- ४८,६९७ - ६३,४९६
१-११-२०२२ - ५०,४४१- ४६,४०६ - ५८,८७५
१-१०-२०२२ - ५०,२०० - ४६,१८४ - ५७,०५३
१-९-२०२२ - ५०,२१६ - ४६,२०० - ५१,७५७
१-८-२०२२ - ५१,३५० - ४७,२४२ - ५७,७४२
सोन्या चांदीचे दर वाढतील असा अंदाज नागरिकांनी बांधला होता. सध्याची परिस्थिती पाहता दर वाढून स्थिरावले आहेत. त्यामुळे आता जर कोणाला सोने किंवा चांदी विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. या सर्वांत एक-दोन टक्के दर कमी-जास्त होणे सहाजिक आहे. आत्तापर्यंत जेव्हा-जेव्हा दर वाढले आहेत, तेव्हा अशीच स्थिती होती.
- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
जगातील काही देशांत निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरातील केंद्रीय बँकांनी वाढवलेला सोन्याचा साठा वाढवला होता. मात्र आता जागतिक मंदीचे संकट दूर होताना दिसत आहे. त्यातून अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे दिसते. त्यामुळे काही काळापुरते दर कमी झाले आहेत. त्यामुळे आता खरेदी करणे योग्य ठरणार आहे. येत्या काळात तेजी राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स