धुळीच्या लोटात उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळीच्या लोटात उपचार
धुळीच्या लोटात उपचार

धुळीच्या लोटात उपचार

sakal_logo
By

योगीराज प्रभुणे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : ‘‘सामान्य नागरिकांचा काही सेकंदांमध्ये जीव गुदमरेल इतकी धूळ सतत उडत आहे. आम्ही नाका-तोंडावर मास्क लावून त्यावर रुमाल बांधतो, तरीही धुळीचा त्रास सहन होत नाही. आमचा रुग्ण मात्र या धुळीत उपचार घेत आहे. धूळ आणि सततच्या आवाजामुळे येथे उपचार घेण्याला रुग्ण कंटाळला आहे,’’ ससून रुग्णालयाच्या मनोरुग्ण विभागात दाखल रुग्णाच्या नातेवाईक सांगत होते.
ससून रुग्णालयातील डेव्हिड ससून इमारत तिच्या मूळच्या स्वरूपात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहे. हा प्रकल्प ज्या इमारतीत सुरू आहे, तेथेच मनोरुग्ण विभाग आणि मानसिक आरोग्य संस्था आहे. हा प्रकल्प करण्याला आमचा विरोध निश्चित नाही. ही प्राचीन वास्तू त्याच्या मूळच्या स्वरूपात बघायला आम्हालाही आवडेलच, पण त्याच वेळी तेथे उपचार घेत असलेल्या मनोरुग्णांचे दुसरीकडे स्थलांतर करणे आवश्यक आहे. धुळीच्या लोटामध्ये रुग्णांवर उपचार कसे होऊ शकतात, असा सवाल आता रुग्णाचे नातेवाईक प्रशासनाला करीत आहेत.

वस्तुस्थिती काय आहे?
१) डेव्हिड ससून इमारतीच्या तळमजल्यावर मनोरुग्ण विभाग आहे. सुमारे ३५ ते ४० रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर तेथे सध्या उपचार सुरू आहेत. १८६७ मध्ये बांधून पूर्ण झालेली इमारत मूळच्या स्वरूपात आणण्याचे काम तेथे सुरू आहे. त्यातून दिवसभर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. त्याच ठिकाणी मनोरुग्णांवर उपचार केले जातात. त्याचा त्रास रुग्ण आणि नातेवाइकांना होत आहे.
२) येथे ये-जा करणारे पोलिस कर्मचारी, रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक धुळीच्या लोटामुळे त्रस्त झाले आहेत.
३) कोरोनानंतर रुग्णालयात बहुतांश ठिकाणी जंतूसंसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरला जातो. पण, डेव्हिड ससून इमारतीमध्ये धूळ प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर होत असल्याचे दिसते. प्रत्येक डॉक्टर, परिचर्या या इमारतीमध्ये मास्कशिवाय फिरू शकत नाही.

मानवी हक्काची पायमल्ली
मानसिक रुग्णांवर चांगल्या वातावरणात उपचार होणे आवश्यक असते. ससून रुग्णालयात धुळीचे लोट उडत असताना मनोरुग्णांवर उपचार सुरू असल्याचे भीषण चित्र दिसत आहे. रुग्ण हक्काबरोबरच ही मानवी हक्काचीही पायमल्ली असल्याची भावना रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.

डेव्हिड ससून इमारतीमधून मानसिक आरोग्य विभागाचे तातडीने स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी बालरोग विभाग असलेल्या आणि सध्या कोरोना लसीकरण केंद्र असलेल्या इमारतीमध्ये हा विभाग स्थलांतरित करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने स्थलांतरित विभागामध्ये रुग्णांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे मनोरुग्णांना चांगल्या वातावरणात उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याबद्दलही संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
- डॉ. संजीव ठाकूर,
अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

ससून रुग्णालयात धुळीच्या लोटात मनोरुग्णांवर उपचार केले जात आहेत. ही परिस्थिती खूपच भयानक आहे. याबाबत आपले मत मांडा....