विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती
विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती

विद्यार्थ्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : भल्या पहाटे गावाला जागे करणारे वासुदेव, चावडीवर दोन भावांचा तंटा सोडविणारे पंच, विहीर व हापस्यावर पाणी भरणाऱ्या महिला, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन्‌ बैलगाडी... असे अनोखे ‘बाशिम गाव’ अवतरले ते थेट शाळेत.
भांडारकर रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दीपूर्ती वर्षानिमित्त दोन दिवसीय ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणार हे टुमदार गाव साकारले होते. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन आणि संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, सचिव डॉ. भरत व्हनकाटे, गायिका आसावरी गाडगीळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, ‘‘शाळेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमात पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले होते.’’

बाशिम गावात काय-काय?
ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजार, जत्रा, बैलगाडी, गोठा, ग्रामीण व्यवसाय, भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृतीचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीवरून फेरफटका मारण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी लुटला.