
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी दोन नवीन उपकेंद्र
पुणे, ता. २८ : वाघोली व परिसरातील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वाघोली येथे नवीन २२०/२२ केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र महावितरणकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जागेअभावी या उपकेंद्राचे काम सध्या रखडलेले आहे. दरम्यान २२/११ केव्ही गेरा उपकेंद्र व एडब्लूएचओ स्विचिंग स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी महावितरणकडून तांत्रिक कामे हाती घेण्यात आली असून, त्याचा फायदा सुमारे ३८ हजार वीजग्राहकांना होणार आहे.
महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रातील वीजभाराची क्षमता ही ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे वाघोली परिसरातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व सर्व वर्गवारीच्या नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणकडून वाघोली येथे नवीन २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि, केवळ जागेअभावी या उपकेंद्राचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. वाघोली अतिउच्चदाब उपकेंद्र उभारल्यास तब्बल १२ उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्सला तसेच ३३ व २२ केव्ही क्षमतेच्या १९ वाहिन्यांना या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे वाघोली परिसरच नव्हे तर नगररोड व मुळशी विभागातील सुमारे दीड लाख ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्याचा फायदा होणार आहे. तसेच पर्यायी स्वरुपाच्या वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
वाघोली परिसरात एकामागे एक तीन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे रविवारी (ता. २६) महावितरणच्या अभियंता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. मात्र साईसत्यम २२ केव्ही वीजवाहिनीला पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा करणे शक्य झाले नाही. यासाठी सिमेंट काँक्रीटकरणाचा रस्ता कारणीभूत ठरला. अतिरिक्त स्वरूपात असलेल्या २२ केव्ही करोला-२ वाहिनीद्वारे साईसत्यम वाहिनीला पर्यायी वीजपुरवठ्याची सोय आहे. मात्र ही वाहिनी पूर्वरंग सोसायटीजवळ सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखाली गेल्याचे दिसून आले. जेसीबी व ब्रेकरने सिमेंट रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर सोमवारी (ता. २७) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करोला-२ वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यापूर्वीच वाघोली वीजवाहिनीवरून साईसत्यम वाहिनीवरचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी ८ वाजता टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.