‘बीआरटी’च्या सक्षमीकरणासाठी भरीव तरतूद आवश्यक : चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बीआरटी’च्या सक्षमीकरणासाठी
भरीव तरतूद आवश्यक : चव्हाण
‘बीआरटी’च्या सक्षमीकरणासाठी भरीव तरतूद आवश्यक : चव्हाण

‘बीआरटी’च्या सक्षमीकरणासाठी भरीव तरतूद आवश्यक : चव्हाण

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमटी) रेनबो बीआरटी सेवेचे सक्षमीकरण करून त्याचे मार्ग १०० किलोमीटरपर्यंत वाढविणे आवश्‍यक आहे. पूर्ण क्षमतेने या सेवेचा वापर केल्यास २०३१ पर्यंत पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या सेवेचा ८० टक्के वाटा असेल. त्यामुळे बीआरटीच्या सक्षमीकरणासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.

जानेवारी महिन्यात ‘पीएमपी’तर्फे बीआरटीच्या बळकटीकरणासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिसांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच कार्यशाळेसाठी स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. वंदना चव्हाण यांनी या कार्यशाळेतील चर्चेनंतर आता पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पत्र पाठवून शिफारशी केल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी प्रणाली वाढवणे, अपूर्ण काम पूर्ण करणे, देखभाल करणे आवश्यक आहे. याबाबत कार्यशाळेतही शिफारस करण्यात आली आहे. या दोन्ही शहरात बीआरटीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी मोठी संधी आहे. उच्च दर्जाची, विश्वासार्ह आणि आर्थिकदृष्‍ट्या परवडणारी ही सेवा असेल. २०३१ पर्यंत पुण्‍यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बससेवेचा ८० टक्के समावेश असला पाहिजे. त्यासाठी विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले १०० किलोमीटरचे नेटवर्क पूर्ण करणे आवश्यक आहे. शहरात उड्डाणपूल आणि रस्ते बांधल्याने केवळ खासगी वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यातून पर्यावरणीयदृष्ट्या गंभीर परिणाम होणार आहेत. हे टाळण्यासाठी बीआरटी प्रणालीचा विस्तार आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.