
अहमदनगर कॉलेजचा आनंद मुठा प्रथम
पुणे, ता. २८ ः इंडियन सोसायटी ऑफ ॲनालिटिकल सायंटिस्ट, पुणे चॅप्टर आणि एच. व्ही. देसाई कॉलेजच्या वतीने ‘प्रोफेसर एस. एफ. पाटील लेक्चर कॉम्पिटिशन’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यामधील महाविद्यालयांतील २४ रसायनशास्त्राचे पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजीज इन केमिस्ट्री’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
स्पर्धेत अहमदनगर कॉलेजच्या आनंद मुठा यांनी प्रथम क्रमांक तर गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेजच्या शीतल पारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक वाघोलीच्या बीजेएस कॉलेजच्या सुहानी पटेल यांनी तर एच. व्ही. देसाई कॉलेजच्या निशा काकडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. एस. एफ. पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी स्वागत केले. पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. निलीमा राजूरकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी कार्यवाह दिलीप जागड, उपप्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन उपस्थित होते.