
पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी
पुणे, ता. १ : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांना प्रथमच टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच सरकारी सेवेनिमित्त मतदारसंघाच्या बाहेर कर्तव्यावर असलेले कर्मचारी तसेच लष्करी, निमलष्करी केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामधील जवानांसाठी असलेली इटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम) यांना मतदानाचा हक्क पोस्टलद्वारे बजाविता येतो.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘कसबा मतदारसंघात ८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदार १९ हजार २४४ आहेत. त्यापैकी २७६ मतदारांनी पोस्टल मतदान केले आहे. उर्वरित ज्येष्ठ मतदारांपैकी काहींनी मतदान केंद्रांवर प्रत्यक्षात येऊन मतदान केले. शारीरिक विकलांग सहा हजार ५७० मतदारांपैकी केवळ २५ मतदारांनी टपाली मतदान केले, तर ‘ईटीपीबीएस’द्वारे ३६ मतदारांपैकी केवळ एक पोस्टल मतदान झाले आहे.’’
परंतु, पोस्टल मतदान हे टपालात असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. काही कारणास्तव मतदानाच्या दिवसापर्यंत पोस्टल मतदान पोचणे अशक्य असते. त्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या सकाळी आठ वाजेपर्यंत आलेले टपाली मतदान ग्राह्य धरले जावे, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार आठ वाजेपर्यंत येणाऱ्या टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.